Rohit Pawar On Sharad Pawar Cast Certificate: राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी जोरदार आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजातून ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध होत आहे. आरक्षणावरुन राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप होत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवासांपूर्वी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचा ओबीसी दाखला असल्याचा दावा करण्यात येत होता, सध्या सोशल मीडियावर पवारांचा दाखला व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. यावर आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले की, भाजपची ती प्रथा आहे, भाजपला सत्य कधी समजत नाही. आणि त्यांना खोट्या गोष्टी कळत असतात. भाजपचे जे पैसे घेऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत, टोल आर्मी आपण त्याला म्हणतो. म्हणजेच प्रत्येक कमेंटला तीन रुपये आणि प्रत्येक लाईकला दहा पैसे अशावर काम करणाऱ्या लोकांनी हा दाखला बदलून व्हायरल केला, असा दावा आमदार रोहित पवार यांनी यावेळी केला आहे.
भाजप हे सत्तेसाठी लढत आहे, आम्ही सत्यसाठी लढतोय. नेमकं खरं सत्य आम्हाला माहित आहे. असत्याची बाजू घेऊन भाजपला सत्तेतमध्ये यायचं आहे. यामुळे लोकांच नुकसान झालं तरी त्यांना फरक पडत नाही. जसे भाजपचे नेते विचार करत असतात, तसेच कार्यकर्ते देखील विचार करत आहेत. कार्यकर्त्यांनी तो दाखला बदलून व्हायरल केल्याचे यामध्ये बघायला मिळत आहे, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी यावेळी केला आहे.
परंतु शरद पवार यांनी ओबीसींचं सर्टिफेकट घेतल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होत होता. त्यामुळे शरद पवार हे ओबीसी झाल्याचा दावा केला जात होता. परंतु, शरद पवार यांचे समर्थक विकास पासलकर यांनी पवार यांचा शाळा सोडल्याचा मूळ दाखला दाखवत सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. शरद पवार यांनी ओबीसींचं सर्टिफिकेट घेतलं नाही, असा दावाही विकास पासलकर यांनी केला आहे.
यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुम्ही दाखल्यावरचं नाव बघितल का? खोटी सर्टिफिकेट मिळणं ही आता मोठी गोष्ट राहिली नाही. मार्केटमध्ये सर्रास अशी सर्टिफिकेटं मिळतात. शरद पवार यांच्यावरील आरोप हा निव्वळ बालिशपणा आहे, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत.