Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आक्रमक झालेल्या विरोधकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मंत्री तुपाशी, जनता उपाशी.. शेतकऱ्यांचे केले हाल मंत्री झाले मालामाल.. अशा घोषणा ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दिल्या.
या आंदोलनात विरोधकांची एकजूट दिसत असली तरी पहिल्यासारखा जोश दिसत नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे तर फक्त दोनच आमदार दिसत होते. कालच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार सहभागी नव्हता. आज मात्र जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे दिसत होते. ठाकरे गटाचे अंबादास दानवे, राजन साळवी, नितीन देशमुख असे काही मोजकेच आमदार होते. तर बाकीचे सगळे आमदार काँग्रेसचे होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा परिणाम येथे स्पष्टपणे दिसून येत होता. राष्ट्रवादीतील काही आमदार सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या गटात अत्यंत कमी आमदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांचे पारडे सध्या तरी कमकुवत झाले आहे. ठाकरे गटाचीही तशीच परिस्थिती आहे.
या घडामोडीत काँग्रेस अजून तरी अभेद्य राहिली आहे. या आंदोलनातही काँग्रेसचेच आमदार सर्वाधिक संख्येने दिसत होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, अशोक चव्हाण, सतेज पाटील यांसह अन्य आमदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर सोमय्या बोललेच; थेट फडणवीसांकडे केली ‘ही’ विनंती
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याने पक्षाची ताकद कमी झाली आहे. संख्याबळ कमालीचे घटले आहे. आमदारांतील संभ्रम अजूनही कायम आहे. या राजकीय नाट्याचे पडसाद अधिवेशनातही उमटत आहेत. आज दुसऱ्या दिवशी सरकारविरोधातील आंदोलनात राष्ट्रवादीचे काहीच आमदार सहभागी झाले होते. दुसरीकडे काँग्रेसच्या आमदारांची संख्या मात्र जास्त होती. सरकारविरोधातील आंदोलनात काँग्रेसने बाजी मारली. महाविकास आघाडीत सध्या तरी काँग्रेसच वरचढ ठरताना दिसत आहे.