Download App

जाहिरातबाजीवर सरकारची कोट्यावधींची उधळपट्टी; रोहित पवारांनी थेट आकडाच सांगितला

Rohit Pawar : राज्य सरकार सध्या शासन आपल्या दारी योजना राबवत आहे. या योजनेच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. कधी मुख्यमंत्री तर कधी उपमुख्यमंत्री जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन मेळावे घेऊन या योजनेचं ब्रँडिंग करत आहे. तर दुसरीकडे विरोधक सरकारच्या जाहिरातबाजीवरील पैशांच्या या उधळपट्टीवर सडकून टीका करत आहे. आताही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारी योजनांसाठीच्या जाहिरातींवर किती पैसे खर्च झाले याची आकडेवारीच सांगितली आहे.

राज्य सरकारने मागील सात महिन्यात 42.44 कोटी रुपयांचा खर्च जाहिरातींवर खर्च केल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. सरकारी योजना काय आहेत, त्याचा लाभ काय, या योजनांचा लाभ कसा मिळवायचा यांसारखी माहिती लोकांना होण्यासाठी सरकारमार्फत जाहिराती केल्या जातात. या खर्चाचा तपशीलच पवार यांनी सादर केला आहे. केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जाहिराती गरजेच्या आहेत का, हा वायफळ खर्च टाळून सर्वसामान्यांसाठी कुठली योजना राबविता आली नसती का, असे टोचणारे सवाल केले आहेत.

रोहित पवार यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. ‘सरकारच्या पहिल्या सात महिन्यात जाहिरातीवरील खर्च 42.44 कोटी म्हणजेच दिवसाला 20 लाख रुपये खर्च. शासन आपल्या दारी योजनेचा निव्व जाहिरातीचा 52.90 कोटी रुपये खर्च. मागच्या वर्षात राबविलेल्य योजनांची यंदा जाहिरात करण्यासाठी 26 कोटी रुपये खर्च. सत्ताधारी आमदारांच्या सुरक्षेसाठी एका वर्षाला 150 कोटी रुपये खर्च. योजना राबविल्या आहेत, कामं केली आहेत, तर इतकी जाहिरात करण्याची खरंच आहे का?, केलली कामं जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जाहिराती गरजेच्या आहेत का?, हा वायफळ खर्च टाळून, सर्वसामान्यांसाठी कुठली योजना राबविता आली असती का?, तुमचं काय मत आहे?’, असे सवाल त्यांनी केले आहेत.

रोहित पवारांनी गिरवला अजितदादांचा कित्ता

अजित पवार विरोधी पक्षनेते असताना ते सुद्धा शिंदे फडणवीस सरकारवर जाहिरातींच्या उधळपट्टीवर जोरदार टीका करत होते. सरकारी योजनांवर उधळपट्टी करण्यापेक्षा तो पैसा सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी खर्च करावे असे म्हणत होते. आता अजितदादा सरकारमध्ये आहेत. त्यामुळे ते अशा मुद्द्यांवर सहसा बोलत नसावेत. मात्र त्यांचाच हा कित्ता रोहित पवारांनी गिरवला आहे. त्यांनी सरकारकडून जाहिरातींवर होणारी उधळपट्टीवर कडाडून टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Tags

follow us