Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात रोजच नवनवीन अन् धक्कादायक घडामोडी घडत आहेत. शरद पवार आणि अजितदादांच्या गु्प्त भेटीची चर्चा संपत नाही तोच आणखी एक गौप्यस्फोट झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार भाजपसोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री करू, अशी अट थेट पंतप्रधान मोदी यांनीच अजित पवार यांच्यासमोर ठेवली असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा धक्कादायक खुलासा करत राजकारणात खळबळ उडवून दिली.
ते पुढे म्हणाले, अजितदादा शरद पवारांना भेटण्यासोबतच त्यांच्यासोबत येण्यासाठी दया, याचना करत असावेत. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र शरद पवार यांच्या बीडमधील भाषणानंतर हा संभ्रम दूर होईल असेही वडेट्टीवार म्हणाले. उद्या गुरुवारी बीडमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे.
पवारांच्या भेटीमागे अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे कनेक्शन; भाजपने टाकलेली अट पूर्ण करण्यासाठी धडपड
आम्हाला अशी माहिती मिळत आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. मात्र, मोदींनी एक अट टाकली आहे. शरद पवार भाजपसोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री करू, असे मोदींनी अजितदादांना सांगितले. शरद पवार भाजपसोबत आले नाहीत तर तुम्हीही मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बाळगू नका, असे मोदींनी स्पष्टपणे अजित पवारांना सांगितल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
अजितदादांना राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे आहे त्यासाठीच ते भाजपने टाकलेली ही अट पूर्ण करण्यासाठी ते वारंवार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना भाजपसोबत येण्याची विनंती करत आहेत. भाजपसोबत चला म्हणून दया, याचना करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. फक्त सत्तेसाठी चाललेला हा खटाटोप आहे. येथे विचारांना तिलांजली दिली जात आहे. येथे केवळ खुर्चीला महत्व आहे, असे दिसून येत आहे. या अटीनंतर शरद पवारांची भू्मिका बदलेल असे वाटत नाही. त्यांनी आधीच भूमिका जाहीर केली आहे. आताही इंडियाच्या बैठकीत ते आपली भूमिका जाहीर करतील. आम्हाला विश्वास आहे की शरद पवार आपली भूमिका बदलणार नाहीत, असे वडेट्टीवार म्हणाले.