Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आज सकाळपासून एक बातमी फिरत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फेसबूक पेज हॅक झाल्याचे स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसे वृत्तही झळकले होते. विरोधकांना आयतं कोलित मिळालं. मात्र, या प्रकाराची दुसरी बाजू आता समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून समाजमाध्यमांवर फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.
शिवाजीराव गर्जे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फेसबूक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे नोंद करुन संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक अजितदादांची प्रतिमा हनन करण्याचा प्रकार सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या फेसबूक पेजबाबतचे ते वृत्त निराधार, धादांत खोटे आणि खोडसाळपणाचे आहे असे गर्जे यांनी म्हटले आहे.
गणेश विसर्जन होताच अजित पवार ॲक्शन मोडमध्ये, ‘देवगिरी’वर आमदारांना हजर होण्याचे आदेश
गेल्या दीड महिन्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून ते समाजातील विविध घटकांशी संवाद साधत आहेत. तसेच ‘लाडकी बहीण योजने’सह महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती देत आहेत. जनसन्मान यात्रेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे काही जणांना पोटशूळ उठला असून ते जाणीवपूर्वक अजित पवार यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत.
असाच प्रकार आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अधिकृत फेसबुक पेजबाबत घडला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून ते समाज माध्यमांमधून फिरवण्यात येत आहेत. तसेच या प्रकरणाची कोणतीही खातरजमा न करता काही इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियावरील माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. माध्यमांनी प्रत्येक गोष्टीची खातरजमा करून वृत्त प्रसिद्ध करणे अपेक्षित होते असे शिवाजीराव गर्जे यांनी म्हटले आहे.