Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेलं बंड आणि त्यानंतर त्यांना मिळालेलं मुख्यमंत्रीपद राजकारणात जसं चर्चेत आहे. त्याहीपेक्षा जास्त चर्चा 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटल्याची होत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एनडीए खासदारांच्या बैठकीत खुद्द पंतप्रधान मोदी यांनी शिवसेनेनेच युती तोडल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा धक्कादायक वक्तव्य केले आहे.
मोदींनी दिल्लीत महाराष्ट्राच्या एनडीए खासदारांच्या बैठकीत सांगितलं की 2019 साली आम्ही युती तोडली नाही, शिवसेनेनं तोडली. हे खोटं आहे. मुळात 2014 साली भाजपनं युती तोडली. एका जागेवरून ती युती तोडण्याची जबाबदारी पक्षानं एकनाथ खडसे यांच्यावर सोपवली होती.
2014 ची युती नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सुचनेवरून भाजपनं तोडली. तेव्हा मोदींची हवा होती. त्यांना स्वबळावर महाराष्ट्र जिंकायचा होता. त्यामुळे 25 वर्षांची मैत्री त्यांना तोडायची होती. नंतर आम्ही परत सत्तेत आलो. 2019 साली त्यांनी पुन्हा युती तोडली. आम्ही तोडली नाही, असा दावा राऊत यांनी केला.
2019 मध्ये अमित शाह मातोश्रीत आले होते. त्यावेळी बंद दाराआड काय चर्चा झाली होती याबाबतही राऊतांनी खुलासा केला. 2019 मध्ये युती करण्यासाठी जेव्हा अमित शाह आले होते त्यावेळी दोन नेत्यांत चर्चा झाली होती. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की जागावाटप, युती, सत्तावाटप यावर एकमत झालं आहे.
कोणत्या जिल्ह्यात कोणी झेंडा फडकवायाचा यावरुन नाराजी नाट्य; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
एकनाथ शिंदे 2019 सालीच मुख्यमंत्री झाले असते. उद्धव ठाकरे त्यांनाच मुख्यमंत्री करणार होते. पण भाजपनं त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायला नकार दिला. तुमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असे त्यांनी विचारल्यानंतर आम्ही एकनाथ शिंदेंचं नाव कळवलं होतं. त्यावेळी शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते होते. त्यानंतर युती तुटली. 2019 मध्ये युती तुटण्याचं कारण एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद आहे. आता मात्र ते खोट बोलत आहेत.