प्रभाग २५ मध्ये पहिल्यांदाच फुलले कमळ… संपूर्ण पॅनल एकतर्फी जिंकले

पहिल्यांदा या प्रभागात कमळ फुलले. ही किमया राहुल कलाटे यांच्या भाजपा प्रवेशानंतर झाल्याचे शहरात बोलले जात आहे

  • Written By: Published:
Untitled Design   2026 01 17T183525.924

The story of public trust and victory in Rahul Kalate : वाकड-पुनावळे–ताथवडे या भागात यंदाची महापालिका निवडणूक केवळ राजकीय स्पर्धा नव्हती, तर ती जनतेचा विश्वास, संघर्ष आणि नेतृत्वाची कसोटी होती. अनेक वर्षे विविध पक्षांचे वर्चस्व असलेल्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये यावेळी इतिहास घडला. पहिल्यांदाच भाजपचा संपूर्ण पॅनल एकतर्फी विजयी ठरला आणि पहिल्यांदा या प्रभागात कमळ फुलले. ही किमया राहुल कलाटे यांच्या भाजपा प्रवेशानंतर झाल्याचे शहरात बोलले जात आहे, कारण कलाटे यांचे स्वतःचे या भागात प्राबल्य आहे.

पॅनलच्या या विजयाच्या केंद्रस्थानी राहुल तानाजी कलाटे आहेत, हे प्रभागातील नागरिक सांगत आहेत. राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार पाहिलेले, संघर्षातून पुढे आलेले आणि जनतेशी थेट नातं जोडणारे नेतृत्व म्हणून राहुल कलाटे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावेळी मतदारांनी त्यांच्यावर निर्विवाद विश्वास टाकत तब्बल २४,११५ मते दिली. त्यांच्या सोबत कुणाल वाव्हळकर (१७,२७५), रेश्मा चेतन भुजबळ (२२,५६६) आणि श्रुती राम वाकडकर (२१,८३७) यांनीही विजय मिळवत भाजपचा संपूर्ण पॅनल यशस्वी केला.

ही लढत सोपी नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) अशा अनेक पक्षांची ताकद एकत्र असतानाही प्रभाग २५ मध्ये भाजपने बाजी मारली. राहुल कलाटे यांचा भाजप प्रवेश सुरुवातीला चर्चेचा विषय ठरला होता. काही ठिकाणी विरोधही झाला. पण प्रचार जसजसा पुढे गेला, तसतसा कलाटेंचा जनसंपर्क, थेट संवाद आणि कामाचा ट्रॅक रेकॉर्ड मतदारांना भावू लागला. विशेषतः आयटी व्यावसायिक राहणाऱ्या सोसायट्यांमध्ये त्यांची लोकप्रियता स्पष्ट दिसून आली. विकास, सुविधा आणि नियोजन या मुद्द्यांवर त्यांनी मांडलेली भूमिका मतदारांना विश्वासार्ह वाटली.

या निवडणुकीत प्रभागात मोठ्या नेत्यांच्या फेऱ्या कमी होत्या. प्रभागातील लढत स्थानिक पातळीवरच लढली गेली. नवनाथ ढवळे, भारती विनोदे, चेतन भुजबळ यांच्यासारख्या प्रभागातील नेत्यांनी खांद्याला खांदा लावून प्रचार केला. आणि त्याच जोरावर जिथे आजवर कमळ फुलले नव्हते, तिथे भाजपने विजय मिळवला. विजयी गुलाल खेळल्यानंतर महिलांनी औक्षण करून आशीर्वाद दिले त्यावेळी राहुल कलाटे भावूक झाले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले.

“हा विजय माझा एकट्याचा नाही, तो आपल्या सर्वांचा आहे. माझे जिवाभावाचे कार्यकर्ते, मतदार आणि कुटुंब या सर्वांचा हा विजय आहे. माझ्या प्रत्येक संघर्षात जनतेने माझ्या पाठीशी उभं राहून मला बळ दिलं. तुम्ही दिलेला विश्वास आणि आशीर्वाद हेच माझं खरं भांडवल आहे,” असे सांगताना त्यांच्या आवाजात कृतज्ञता होती. राहुल कलाटे यांनी दिलेल्या शब्दांची आठवण करून देत ठामपणे सांगितले, “जनतेने दिलेला शब्द पूर्ण केला. पक्षाने दिलेली जबाबदारी देखील पार पाडली. भाजपचा संपूर्ण पॅनल निवडून आला. आता आम्ही दिलेले सर्व शब्द पूर्ण करणार आहोत.”

प्रभाग २५ मध्ये पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला आहे. पण हा विजय केवळ राजकीय यश नाही, तो विश्वासाचा कौल आहे. संघर्षातून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाला मिळालेली ही मान्यता आहे. आणि आता या विजयाच्या पुढच्या टप्प्यावर, विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारीही तितकीच मोठी आहे.

Tags

follow us