Sharad Pawar vs Ajit Pawar : शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंना बळ देत थेट मुख्यमंत्री पदाच्या खु्र्चीवर बसविल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोर्चा वळविण्यात आला आहे. राष्ट्रवादीत फूट पाडून सरकारसोबत आलेल्या अजित पवारांना बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच हा खळबळजनक खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीचे नाव आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाकडे जाईल याची रणनीती दिल्लीत ठरविली जात आहे. यामागे मोदी-शाहांचा हात आहे, असा गौप्यस्फोट पवार यांनी केला.
राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवारांनी संख्याबळाच्या जोरावर पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. केंद्र सरकारकडून पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याबाबत दबाव आणला जात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे. मात्र भाजपविरोधात घेतलेल्या भूमिकेत कोणतीही तडजोड करणार नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले.
‘उद्धवजी, वाचाळपणा बंद करा अन्यथा लोकांचा संयम’..; विखे पाटलांचा ठाकरेंना रोखठोक इशारा
अधिवेशन सुरू असल्याने पवार सध्या दिल्लीत आहेत. पुण्यातील कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात दिल्लीत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी पवार यांनी कार्यकर्त्यांना कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आगामी काळात पक्षाची काय रणनीती राहणार याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयात केंद्रातील काही नेत्यांचा हस्तक्षेप सुरू आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दुसऱ्या गटाला देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र काहीही झाले तरी केंद्राच्या दबावाला बळी पडणार नाही. भाजपविरोधात घेतलेल्या भूमिकेपासून दूर जाणार नाही. आपण पुन्हा सर्वकाही उभे करून दाखवू. आपल्याला भाजप विरोधात लढायचे आहे. मनात काही शका आणू नका, निवडणुकांच्या तयारीला लागा, असे शरद पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच अन् पक्षही एकच, जितेंद्र आव्हाडांनी ठणकावून सांगितलं…
दरम्यान, शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) आगामी काळातील वाटचाल कशी राहिल याचा थोडासा अंदाज येत आहे. मात्र राज्यात मागील दीड वर्षांपासून ज्या अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत त्यावरून राजकारणात काहीही होऊ शकते याचा प्रत्यय येतो. त्यामुळे आगामी काळात आणखी काय घडामोडी घडतात यावरच पुढील राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत.