Radhakrishna Vikhe : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी पुण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, जयंत पाटील यांनीच माध्यमांसमोर येत आपण अमित शाह यांना कधीच भेटलो नाही, असे सांगितले. तसेच गैरसमज पसरवणाऱ्या बातम्या दिल्या म्हणून वृत्तवाहिन्यांनाही फटकारलं. तरीही अशा चर्चा सुरूच आहेत. यावर आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले आहे.
उद्धव ठाकरे महाराष्ट्र अन् पक्षासाठी नष्टर.., चित्रा वाघ यांच्या ट्विटने लक्ष वेधलं
मंत्री विखे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. जयंत पाटील यांनी स्वतःच त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना स्वतःलाच आता त्या पक्षात एकटा पडलोय असे वाटत आहे. राजकारणात काहीही घडू शकतं त्यामुळे निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. अजितदादा आले त्यांचं स्वागत केलं. अन्य आमदार आले त्यांचंही स्वागत केलं. त्यामुळे जयंत पाटील यांच्याबाबत वेगळी भूमिका असण्याचे कारण नाही. ते जर आले तर त्यांचं स्वागतच आहे, असे विखे म्हणाले
लाचखोरांमुळे महसूल विभागाची बदनामी होते आहे. सर्व स्तरावर एक मोहीम हातात घ्यावी लागेल आणि एक पोर्टल सुरू करण्याचा विचार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल. अशा लाचखोरांवर कठोर शासन केले जाईल. अनेक वर्षांपासून तक्रारी आहेत. मागच्या काही वर्षात वाळू माफियांना राजाश्रय होता. भ्रष्टाचार निर्मुलनासाठी निश्चित एक धोरण राज्यात आणावे लागेल, असे विखे म्हणाले.
हे सगळं बदनाम करण्यासाठी सुरू आहे. यात काहीच तथ्य नाही. मी स्वतः जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा केली आहे. त्यांनी सांगितलं मी मुंबईतच होतो. मी त्यांच्या अनेक नेत्यांशी बोललो. त्यांनीही तेच सांगतिलं. त्यामुळे मला विश्वास आहे की जयंत पाटील हे अशा टोळीत नक्कीच जाणार नाहीत. ते आमच्याबरोबरच राहतील, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली होती.