उद्धव ठाकरे महाराष्ट्र अन् पक्षासाठी नष्टर.., चित्रा वाघ यांच्या ट्विटने लक्ष वेधलं
Chitra Wagh : उद्धव ठाकरे महाराष्ट्र अन् पक्षासाठी नष्टर असल्याची टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. यासंदर्भात वाघ यांनी ट्विट केलं आहे. काल मुंबईत संभाजी ब्रिगेडने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मस्टरमंत्री झाल्याचं म्हणत डिवचलं होतं. त्यानंतर आता भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात येत आहे.
स्वतःच्या पक्षासाठी डिझास्टर ठरलेल्या उद्धव ठाकरेंना @uddhavthackeray मस्टर आणि मास्टर ब्लास्टरमधला फरक तो काय कळणार?
तुम्ही मुख्यमंत्रीपदी असताना पक्षातील आमदार खासदारांना सांभाळता आले नाही, यापेक्षा मोठं डिझास्टर काय असू शकतं आणि विरोधी पक्षात असताना एकही आमदार देवेंद्र…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 7, 2023
चित्रा वाघ ट्विटमध्ये म्हणाल्या, “स्वतःच्या पक्षासाठी डिझास्टर ठरलेल्या उद्धव ठाकरेंना @uddhavthackeray मस्टर आणि मास्टर ब्लास्टरमधला फरक तो काय कळणार? तुम्ही मुख्यमंत्रीपदी असताना पक्षातील आमदार खासदारांना सांभाळता आले नाही, यापेक्षा मोठं डिझास्टर काय असू शकतं आणि विरोधी पक्षात असताना एकही आमदार देवेंद्र फडणवीसजी @Dev_Fadnavis यांना सोडून गेला नाही, यापेक्षा उत्तम नेतृत्व ते काय असू शकतं?
देवेंद्रजींनी विरोधी पक्षनेते असताना तुमच्या तिघांच्याही दांड्या उडवल्या आणि सत्तेत असताना निर्णयाचे चौकार-षटकार लगावले. देवेंद्रजी मस्टर नव्हे, तर मास्टर ब्लास्टर मंत्री आहेत, हे लक्षात ठेवा. तुम्ही मात्र राज्य आणि स्वत:चा पक्ष या दोघांसाठीही नष्टर आहात, हेही विसरू नका. अभ्यास कच्चा असल्यामुळे नापास झालेल्या विद्यार्थ्यानं मेरिटमध्ये आलेल्यांवर बोलायचं नसतं”
काय म्हणाले होते ठाकरे?
आधी शिवसेना पक्ष चोरला आता राष्ट्रवादी चोरला आहे, एवढंच नाहीतर आता काँग्रेसच्या फोडायच्या तयारीत आहेत. आधी एक उपमुख्यमंत्री होता आता दुसरा उपमुख्यमंत्री आहे, असंच पक्षात कोण आले आणि कोण गेले हे लिहिण्यासाठी देवेंद्र फडणवीस आता मस्टरमंत्री झाले आहेत.
दरम्यान, सत्तासंघर्षानंतर ठाकरे गट आणि भाजपमध्ये चांगलीच खडाजंगी होत असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाचे नेते आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु असतानाच आता उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना मस्टरमंत्री म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला जात आहेत. त्या टीका-टिप्पण्यावरुन अद्याप उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं नसून ते काय बोलणार? याकडं सर्वांच लक्ष आहे.