Debit Card : खिशातील डेबिट कार्डवर मिळतो 10 लाखांपर्यंतचा मोफत विमा, कसा करता येतो क्लेम?

Free Insurance On Debit Card बँकांकडून डेबिट कार्डवर देण्यात येणारी विम्याची रक्कम ही तुमच्या कार्ड श्रेणीवर अवलंबून असते.

  • Written By: Published:
Debit Card : खिशातील डेबिट कार्डवर मिळतो 10 लाखांपर्यंतचा मोफत विमा, कसा करता येतो क्लेम?

Free Insurance On Debit Card Know How To Claim :  आपल्यापैकी बहुतेक जण आपले डेबिट कार्ड फक्त एटीएममधून पैसे काढण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी वापरतात. पण, तुमच्या खिशात असलेल्या डेबिट कार्डवर 10 लाखांपर्यंतचा विमा मिळतो असे कुणी सांगितलं तर, विश्वास बसणार नाही ना? नेमका हा विमा काय आणि कोणत्या बँका तो देतात क्लेम कसा करता येतो? त्याबद्दल सोप्या भाषेत समजून घेऊया…

कोणत्या बँका देतात मोफत विमा

एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँक यासारख्या अनेक प्रमुख भारतीय बँका त्यांच्या डेबिट कार्डवर मोफत विमा देतात. हा विमा सामान्यतः ग्रुप पॉलिसीचा भाग म्हणून समाविष्ट केला जातो, त्यामुळे वेगळा पॉलिसी क्रमांक जारी केला जात नाही. देण्यात येणाऱ्या या कव्हरमध्ये वैयक्तिक अपघात, विमान अपघात, खरेदी संरक्षण आणि कार्डची फसवणूक यासारख्या गोष्टींचा समावेश असू शकतो.

मोफत विमा कव्हरेजसाठी नियम अन् अटी

बँकाकडून डेबिट कार्डवर लागू असलेल्या मोफत विमा कव्हरेजसाठी काही नियम आणि अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. ज्यात सर्वात पहिले म्हणजे तुमचे डेबिट कार्ड सक्रिय असेल तरच हा विमा लागू होतो. याचा अर्थ काय तर, ठरवून दिलेल्या कालावधीत डेबिट कार्ड वापरून ट्रॅन्झॅक्शन पूर्ण होणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, काही बँकांच्या नियमानुसार 60 किंवा 90 दिवसांत किमान एक किंवा काही विशिष्ट खरेदी किंवा ऑनलाइन पेमेंट करणे आवश्यक असते. ठरवून दिलेल्या कालावधीत व्यवहार झाला तरचं हे विमा कव्हर लागू होते अन्यथा नाही.

डेबिट कार्ड कसे ठेवाल सक्रीय

आज ऑनलाईन पेमेंटमुळे अनेकजण डेबिट कार्ड वापरत नाही. पण, खिशातील डेबिट कार्ड सक्रीय ठेवण्यासाठी तुम्ही वीज बिल, मोबाईल रिचार्ज किंवा पेट्रोल यासारख्या दैनंदिन खर्चाचे पैसे देऊ शकता. यामुळे आवश्यक व्यवहार पूर्ण करण्याची अटही पूर्ण होईल आणि विमा कव्हरेजही मिळू शकेल.

विमा संरक्षणाची रक्कम किती?

बँकांकडून डेबिट कार्डवर देण्यात येणारी विम्याची रक्कम ही तुमच्या कार्ड श्रेणीवर अवलंबून असते. सर्व सामान्य म्हणजेच रेग्युलर डेबिट कार्डवर साधारण 1 लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळते. तर, प्लॅटिनम किंवा प्रीमियम कार्डवर 2 ते 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळू शकते.तर, काही प्रीमियम कार्डवर ही रक्कम 10 लाखांपर्यंत असू शकते.

क्लेम कसा करावा?

जर कार्डधारकाचा अपघात झाला तर, नॉमिनी असलेल्या व्यक्तीने ठरवून दिलेल्या वेळेत बँकेला याबाबत कल्पना देणे आवश्यक आहे. सामान्यतः 30 ते 60 दिवसांच्या आत दावा दाखल करणे अनिवार्य मानले जाते. यासाठी क्लेम फॉर्म, गरजेचे अपघातात मृत्यू झाला असल्यास मृत्यू प्रमाणपत्र, पोस्टमार्टम रिपोर्ट, अपघात झाल्यास एफआयआर आणि नॉमिनीचे केवायसी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तसेच डेबिट कार्ड सक्रिय आहे यासाठी बँक स्टेटमेंट देखील कधीकधी मागितले जाऊ शकते.

डिस्क्लेमर : वरील बातमी सामान्य माहितीवर आधारित असून, तुमच्या खिशातील डेबिटकार्डवर विमा मिळेलच असा दावा लेट्सअप मराठी करत नाही. विमा कव्हरेज मिळते की नाही यासाठी तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क करू शकता.

follow us