Download App

Ajit Pawar : माझा राजकारणातला वारसदार कोण? अजितदादांनी उत्तर सांगूनच टाकलं

Ajit Pawar Birthday : ‘माझा राजकीय वारसदार कोण असेल असा विचार मी कधीच केला नाही. असा विचार करण्यात काही अर्थही नसतो. ज्याच्यात कर्तुत्वगुण, नेतृत्वगुण असतात ते लोक पुढे जात असतात. राजकीय लोकांच्या कुटुंबातील पुढील पिढीला प्रत्येकालाच राजकारणाची आवड असते असे नाही. आता आमच्या इतक्या मोठ्या परिवारात राजकारणाची आवड कुणाला होती तर शरद पवार साहेबांना. तिसऱ्या पिढीत आम्ही सगळी 15 भावंडं. या पंधरा भावंडात राजकारणाची आवड कुणाला होती तर अजित पवार. पुढल्या पिढीत रोहितला राजकारणाची आवड होती, तो पुढे आला. सुप्रिया सुळेंनाही राजकारणाची आवड होती. माझ्यानंतर ती राजकारणात आली’, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या राजकीय वारसदाराबाबत भाष्य केलं.

ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत राजकारणापलीकडचे अजित पवार नेमके कसे होते, ते कसे घडले, अजितदादांचं बालपण, शिक्षण, राजकारणातील प्रवेश या विविध मुद्द्यांवर अजित पवार यांनी स्वतः माहिती दिली.

राजकीय करिअरच्या सुरुवातीचा प्रसंग सांगताना अजितदादा म्हणाले, माझी पहिली निवडणूक काटेवाडी गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची होती. त्यात आमच्या पॅनलचे 18 उमेदवार निवडून आले. ही निवडणूक 1984 साली झाली होती. त्यानंतर बारामती बँकेच्या संचालक पदाची निवडणूक लढली. तिथे निवडून आलो. चेअरमन झालो. त्यानंतर 1991 मध्ये खासदारकीचं तिकीट मिळालं. खासदारही झालो. काँग्रेसमध्ये एक नंबरने आणि देशात दोन नंबरचे मताधिक्य मिळवत मी खासदार झालो. त्यावेळी मला साडेचार लाख मते मिळाली होती. तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला एक लाख मते मिळाली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली.

मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस

दिल्लीच्या राजकारणात मला जायचंच नाही. पक्षाने जरी मला सांगितलं तरी मी त्यांना सांगेन की दुसऱ्या कुणाला तरी सांगा. आपण त्यासाठी सर्वस्व पणाला लावू. मी तिथलं राजकारण पाहिलं आहे. ते जरा वेगळ्या प्रकारचंच राजकारण आहे. महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं आहे. मला लोकांची कामं करणं, स्वतःची मते स्पष्टपणे मांडण्यास आवडते त्यामुळे मला महाराष्ट्राच्याच राजकारणात रस आहे, असे पवार म्हणाले.

follow us