सुळे अन् सुनेत्रा पवारांची भूमिका, NCP विलिनीकरणाचा गेम संपला?; कुणाचे पत्ते कापले गेले?

Supria Sule Sunetra Pawar On Both NPC Merger महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय.

Supria Sule Sunetra Pawar On Both NPC Merger

Supria Sule Sunetra Pawar On Both NPC Merger

Supria Sule Sunetra Pawar On Both NPC Merger :  महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. दिवाळीच्या मुहूर्तावर दिल्ली दौरे, गुप्त गाठीभेटी, मंत्रिपदांच्या वाटपाचे अंदाज आणि नेत्यांचे दावे-प्रतिदावे यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व चर्चांना कायमचा ‘फुलस्टॉप’ लावलाय. एवढेच नव्हे तर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेनेही या प्रकरणाला नवीन वळण मिळालयं. या संपूर्ण राजकीय नाट्यातून नेमके कोणाचे हित साधले गेले आणि सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या भूमिकांमुळे फसलेल्या विलीनीकरणाचा खेळात नेमके कुणाचे पत्ते कट झाले याबद्दल समजून घेऊया..

मुळात विलीनीकरणाची चर्चा अचानक समोर आली ती दिल्लीतील काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीनंतर. राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेत्यांना असे वाटत होते की, स्वतंत्र पक्ष राहिल्यापेक्षा पुन्हा एकत्र आल्यास किंवा महायुतीत स्वतंत्र घटक म्हणून राहिल्यास आपली राजकीय बार्गेनिंग पॉवर टिकून राहील. खुद्द छगन भुजबळ यांनी, “अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात माझ्या उपस्थितीत 40-45 मिनिटे विलीनीकरणावर चर्चा झाली होती,” असा दावा केलाय. एवढेच नव्हे तर, मी आजारी असताना जयंत पाटील आणि अजित पवार विचारपूस करण्यासाठी आले होते. त्या भेटीदरम्यान मी स्वत: पुढाकार घेऊन अजित पवार चांगले नेतृत्व करत असून सर्वांनी पुन्हा एकत्र यायला हवे अशी भूमिका मांडल्याचेही भूजबळ म्हणाले आहेत.

सुनेत्रा पवारांचा ‘वेट अँड वॉच’ आणि पेशन्स गेम

एकीकडे विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असताना, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अतिशय संयमी भूमिका घेतली. त्यांनी कोणतीही घाईगडबड न करता, तातडीने आमदारांचे शक्तीप्रदर्शन करण्याचे टाळले. त्यांनी पडद्यामागून पक्षातील 80 टक्क्यांहून अधिक आमदारांची मते जाणून घेतली. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून, “जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर, आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे सध्यातरी विलीनीकरणाला आमची मान्यता नाही. मात्र, दुसरी राष्ट्रवादी स्वतंत्र घटकपक्ष म्हणून एनडीएमध्ये येणार असेल तर, आमचा विरोध नाही,” अशी स्पष्ट भूमिका सुनेत्रा पवार यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं असल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवारांच्या या धोरणामुळे सिंडिकेट नेत्यांचा डाव त्यांच्यावरच उलटल्याची चर्चा आता राजकीय गोटात सुरू झाली आहे.

दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत अतिशय स्पष्ट शब्दांत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनिकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्या म्हणाल्या की,, “माझा भाऊ (अजित पवार) होता तोपर्यंत विलीनीकरणाची चर्चा होती, तारीखही ठरली होती. पण, ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्याच दिवशी माझ्या मनात आणि पक्षात विलीनीकरणावर फुलस्टॉप लागला.”

सुप्रिया सुळे यांच्या या भूमिकेमुळे दोन गोष्टी साधल्या गेल्या एक म्हणजे एनडीए किंवा भाजपसोबत जाण्याच्या कोणत्याही चर्चेला थेट नकार देऊन महाविकास आघाडीतील (काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट) मित्रपक्षांमध्ये निर्माण होणारा संभ्रम दूर केला. दुसरं म्हणजे पक्षाची विश्वासार्हता टिकवून ठेवली, जी सातत्याने अशा चर्चांमुळे डागाळत चालली होती.

आता या संपूर्ण राजकीय घटनाक्रमाचे विश्लेषण केल्यास हा ‘गेम’ कोणाच्या फायद्याचा ठरला आणि कोणावर उलटला तर, भुजबळ आणि तटकरे यांसारख्या ज्येष्ठ नेते विलीनीकरणाची हवा तयार करून सुनेत्रा पवारांवर दबाव आणून स्वतःची राजकीय सोय बघत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. या सर्वांमागे सुनेत्रा पवार यांच्यावर राजकीय दबाव निर्माण करणे, पक्षाच्या रचनेत स्वतःचे महत्त्व टिकवून घेणे हा मुख्य हेतू असल्याचीही चर्चा होती. पण, या सर्व विलीनिकरणाच्या चर्चांमध्ये कोणतीही मोठी प्रतिक्रिया न देता संयम राखत सुनेत्रा पवारांनी पक्षावर आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे. तसेच विलीनीकरण झाले नाही तरी चालेल पण, पक्षाचे अस्तित्व अबाधित राखण्यात सुनेत्रा पवार यशस्वी ठरल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. तर, सुप्रिया सुळे यांच्या रोखठोक भूमिकेमुळे या नेत्यांचे विलीनीकरणातून स्वतःचे राजकीय पुनरुत्थान करण्याचे स्वप्न भंगल्याचे चित्र आता समोर आले आहे.

Exit mobile version