Download App

Raigad Landslide : इर्शाळवाडीवर कोसळला दुःखाचा डोंगर; राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Raigad Landslide :  रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावात मुसळधार पावसाने रौद्ररुप दाखवलं. या पावसात अख्ख्या गावावरच मोठी दरड कोसळली. रात्री लोकं झोपेत असतानाच काळाने हा घाला घातला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झाला. आता दिवस उजाडल्यावर या भयानक घटनेचं मन विषण्ण करणारं खरं रुप समोर आलं आहे. लोकांचे रडणं, ओरडणं आणि आपल्या आप्तस्वकियांना शोधण्यासाठी सुरू असलेली धडपडच दिसते आहे. या घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून 22 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.

आता या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत माहिती घेतली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला.

राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून या पावसाने जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे. आता रायगड जिल्ह्यात एक भयंकर दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील खालाापूर तहसील क्षेत्रातील इरसालवाडी या गावात दरड कोसळून अनेक कुटुंबे मलब्याखाली अडकून पडली आहेत. या दरडेखाली शंभरपेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 22 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.

इर्शाळवाडीत नेमकं काय घडलं ?

महिला म्हणाली, ‘बुधवारी रात्री मोठा पाऊस सुरू होता. वाराही सुटला होता. आम्ही घरातच होतो. अचानक बाहेर काहीतरी मोठा आवाज झाला. आम्हाला वाटलं की एखादं घरच पडलं आहे. पण, बाहेर येऊन पाहिलं तर अख्खं गावच ढिगाऱ्याखाली दबलं गेलं होतं. आमच्या शेजारील काही घरेही दबली गेली होती. त्यानंतर आम्ही आरडाओरडा करू लागलो. घरातील सदस्यांना घेऊन पटकन बाहेर पडलो.’

फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती

ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 टीम घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन टीम थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Tags

follow us