Rohit Pawar : विधिमंडळ अधिवेशनात आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर करणार आहे. अर्थसंकल्पातून राज्याला काय मिळणार, याची चर्चा सुरू असतानाच विरोधी पक्षांनी मात्र या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न चालविला आहे. सरकारकडून अर्थसंकल्पात नवनवीन घोषणा केल्या जातील मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारचे कान टोचले आहेत.
रोहित पवार म्हणाले, की या सरकारने इंटरनॅशनल फायनान्स सेंटर गुजरातला (Gujarat) गिफ्ट केले. हे सेंटर जर आज मुंबईत (Mumbai) असते तर येथे किमान दीड लाख रोजगार निर्माण झाले असते. महाविकास आघाडीचे सरकार (MVA) असताना राज्यातील एफडीआय (थेट परकीय गुंतवणूक) तेरा हजार कोटी रुपये होता. तो या सरकारच्या काळात निम्म्याने कमी होऊन साडेसात हजार कोटी रुपयांवर आला आहे. कंपन्यांची जास्तीत जास्त गुंतवणूक राज्यात आणली तरच राज्याचा विकास जलद गतीने होईल, असे पवार यांनी सांगितले.
वाचा : Rohit Pawar : हे सरकार लोकांच्या हितासाठी नाही तर बदला घेण्यासाठी स्थापन झाले
राज्य सरकारचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. चांगली गोष्ट आहे. मात्र अर्थसंकल्प सादर करताना फक्त मुंबईवर लक्ष केंद्रीत न करता संपूर्ण राज्यावर फोकस असायला हवा असा सल्लाही आ. पवार यांनी दिला. आगामी काळात निवडणुका आहेत म्हणून निधी मिळेल पण हा निधी फक्त सुशोभिकरणावरच खर्च व्हायला नको मोठ्या शहरात विकासाची अनेक कामे प्रलंबित आहेत ही कामे पूर्ण करण्यासाठी या निधीचा वापर व्हावा, असेही पवार यांनी सांगितले.
गेल्या सात ते आठ महिन्यांच्या काळात महाराष्ट्राच्या अस्मितेला तडा गेला तरीही या सरकारने काहीच केले नाही. बजेटमध्ये आता निधी दिला जाईल पण नुसता निधी देऊन उपयोग नाही तर जास्तीत जास्त रोजगार कसे निर्माण होतील हे सरकारने बजेट सादर करताना पाहिले पाहिजे, अशी अपेक्षा आ. पवार यांनी व्यक्त केला.
ज्या कामांवर स्थगिती दिली गेली त्या कामांवरील स्थगिती हे सरकार उठवेल. विकासकामांनाच स्थगिती दिली असे नाही स्कॉलरशीप सगळ्या अडकलेल्या आहेत. जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करत आहेत त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे आ. पवार म्हणाले.