Budget Session : राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्याच्या प्रकारामुळे आजही विधिमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक आहेत. या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार गदारोळ घातला. यामुळे काही वेळासाठी कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर विरोधकांना उत्तरे देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) स्वतः मोर्चा सांभाळला. त्यांनीही संतापाच्या भरात विरोधकांवर जोरदार प्रहार केले.
विधानसभेचे कामकाज (Budget Session) सुरू झाले तेव्हा विरोधकांनी कालच्या प्रकारावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांच्या फोटोला सत्ताधाऱ्यांकडून जोडे मारण्याच्या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच यामध्ये सहभागी असणाऱ्यांवर कारवाई करा त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांनीही या प्रकाराचा कडक शब्दांत निषेध केला.
वाचा : एकनाथ शिंदे हे फक्त खुर्च्यांचे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरेंनी पुन्हा डिवचले..
पटोले यांनी जी मागणी केली त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून मुख्यमंत्र्यांना खोके-बोके म्हणतात, तेव्हा काय होतं ? मुख्यमंत्रीपद संवैधानिक नाही का ? मुख्यमंत्र्यांना खोके-बोके म्हटलेले कसे चालते ? अस प्रश्न त्यांनी केला.
यानंतर वाद अधिकच वाढत असल्याचे पाहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप केला. अहवाल तपासून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरीदेखील विरोधकांचा गोंधळ काही शांत होत नव्हता. विरोधकांकडून मोदी चोर है च्या घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार संतापले. त्यांनीही मोर्चा सांभाळला.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना या देशातील मतदारांनी निवडून दिले आहे. कुणाच्या औकातीत नाही हे. कुणाच्या भीकेवर ते पंतप्रधान झालेले नाहीत. पळपुट्या माणसाच्या पक्षाने मोदींना चोर म्हणणं सहन करण्यासारखे नाही. ती तर बाहेरची भूमिका होती पण सभागृहात मोदींना चोर म्हटले गेले. यानंतर वाद वाढत गेल्याने विधिमंडळाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले.