Download App

अजित पवार भाजपबरोबर जाणार का ? ; सुप्रिया सुळे म्हणाल्या, याचं उत्तर..

Supriya Sule : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज केलेल्या एक ट्विटमुळे तुफान चर्चेला तोंड फोडले आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच 15 आमदार बाद होणार असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळेही यांनीही भाष्य केले आहे.

नाना पटोले म्हणाले, मविआच्या वाढत्या प्रभावानं विरोधक धास्तावले

अंजली दमानियांचा दावा काय ?

दमानिया यांनी आज सकाळी एक ट्विट करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत.. तेही लवकरच बघू.. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची, असे ट्विट त्यांनी केले.

या ट्विटनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. या ट्विटवर अजित पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिले. ते म्हणाले, मी छोटा कार्यकर्ता असून इतक्या मोठ्या व्यक्तीबद्दल काय बोलणार ? असे म्हणत त्यांनी या मुद्द्यावर आधिक भाष्य करणे टाळले.

 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

यानंतर या प्रकारावर खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, ‘भाजपकडून अजित पवार यांना बदनाम करण्याचा हा डाव आहे. याआधीही त्यांच्यावर असे आरोप करण्यात आले होते. ट्विटर किंवा अंजलीताई यांना अजून तरी मत मांडण्याचा अधिकार या देशात आहे. त्यांचं ट्विट मी काही वाचलेलं नाही. मात्र त्यांनी काही लिहीलं असेल तर त्यांना अधिकार आहे.’

अजित पवार खरेच भाजपात जाणार का ?, या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, ‘पंधरा मिनिटात येथे मुळशीत पाऊस पडेल का ?, याचे उत्तर माझ्याकडे नाही. आता तर येथे ऊन आहे हे मी सांगू शकते. पण, पंधरा मिनिटांनंतर पाऊस पडेल की नाही ?, हे मी सांगू शकत नाही.’

 

Tags

follow us