मुंबई : राज्यामधील हवामानात सतत बदल होत आहे. एकीकडे थंडीचा मौसम असताना आता हवामान विभागाकडून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्यात आज आणि उद्या म्हणजेच शनिवारी व रविवार रोजी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशा या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर (Agriculture Crop) परिणाम होत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. पावसाच्या आगमने थंडीचा प्रभाव काहीसा कमी होण्याची शक्यता वर्तली जात आहे.
मुंबईसह कोकण आणि विदर्भात जाणवत असलेला थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील 10 आणि मराठवाड्यातील सात अशा 17 जिल्ह्यात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच आज आणि उद्या काही ठिकाणी तुरळक पावसाची देखील शक्यता आहे. त्यामुळं मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीचा प्रवाभ कमी होण्याची शक्यता आहे.
राज्यात पुन्हा थंडीची लाट येणार
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सध्या राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा कडाका जाणवत आहे. अशातच आता 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट (Cold Wave) येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत ही थंडीची लाट कायम राहणार आहे.
महाराष्ट्रात तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. या हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर (Rabi Crop) परिणाम होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा (Karpa) प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या वातावरणाचा फटका पिकांना बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.