Download App

पुढील 48 तास धोक्याचे! महाराष्ट्रावर नवं संकट, अरबी समुद्रात ‘शक्ती’ चक्रीवादळ…

भारतीय हवामान विभागानुसार (IMD) अरबी समुद्रात ‘शक्ती’ नावाचं चक्रीवादळ (Shakti Cyclone) निर्माण होत आहे.

Maharashtra Weather Update Shakti Cyclone Alert : यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्राला अतिमुसळधार पावसाचा मोठा फटका बसला. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला. नद्या आणि ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला, तर अनेकांच्या घरात नदीचं पाणी शिरल्याने संसार उद्ध्वस्त झाले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडी विश्रांती दिली असली तरी पुन्हा एकदा निसर्गाच्या कोपाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

‘शक्ती’ नावाचं चक्रीवादळ

भारतीय हवामान विभागानुसार (IMD) अरबी समुद्रात ‘शक्ती’ नावाचं चक्रीवादळ (Shakti Cyclone) निर्माण होत आहे. या वादळाची तीव्रता पुढील 48 तासांत वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईलाही या चक्रीवादळाचा परिणाम जाणवू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त (Maharashtra Weather Update) केला आहे. सध्या हे वादळ पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत असून, खोल समुद्रात वाऱ्याचा वेग (Heavy Rain) ताशी सुमारे 50 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

पुढील 48 तास…

या चक्रीवादळाच्या परिणामामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भात काही ठिकाणी वीजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर मराठवाडा आणि सोलापूर परिसरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांनी मासेमारीला तात्पुरता विराम दिला आहे. हवामान खात्यानेही पुढील दोन ते तीन दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. मत्स्य विभागाकडूनही या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

follow us