Download App

ठाकरेंची साथ का सोडली ? ; घोलेंनी ‘या’ दोन व्यक्तींची नावे घेत केला मोठा खुलासा

Maharashtra Politics : मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेवक तथा युवा सेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोले (Amey Ghole) यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. घोले शिंदे गटात गेल्याने आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, घोले हे त्यांच्या कोअर कमिटीत काम करत होते.

मात्र,  तरीही त्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. असे नेमके काय घडले ?, की त्यांच्यावर थेट राजीनामा देण्याची वेळ आली. ठाकरे आणि त्यांच्यात काही बिनसले होते का ?, या प्रश्नांची उत्तरे त्यांनी  ट्विटरवर एक पत्र शेअर करत दिले आहे.

या पत्रात त्यांनी दोन व्यक्तींची नावे घेतली आहेत. त्यामुळेच आपण ठाकरेंची साथ सोडल्याचे त्यांनी म्हटले आहे. घोले यांनी आधी कोअर कमिटीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर घोले शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. आज अखेर त्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेच्या गटात प्रवेश केला.

ठाकरेंना धक्का…आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अमेय घोलेंचा शिवसेनेत प्रवेश

याबाबत त्यांनी ट्विटरवर एक पत्र शेअर केले. त्या पत्रात त्यांनी दोन व्यक्तींवर आरोप करत पक्ष सोडल्याचे म्हटले आहे. या पत्रात घोले म्हणतात, ‘मी राजकारणात आलो तुमच्यामुळे. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला युवा सेनेच्या माध्यमातून संधी दिली. तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी मी गेली 13 वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. परंतु, वडाळा मतदारसंघात काम करताना महिला संघटक श्रद्धा जाधव आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी वारंवार माझ्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला काम करताना खूप त्रास व मनस्ताप झाला.’

‘याबाबत मी आपल्याला वेळोवेळी माहिती दिली. संघटनेतील काही मतभेद दूर व्हावे व मला सुरळीपणे माझे कार्य सुरू ठेवता यावे म्हणून मी खूप प्रयत्न केला. परंतु, काही कारणांमुळे यावर काहीच मार्ग काढता आला नाही. त्यामुळे आज अखेरीस जड अंतःकरणाने मला युवासेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे’, असे घोले यांनी या पत्रात म्हटले आहे.

साडे अकरापर्यंत थांबा काय घडत ते पहा; राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंचे मोठं विधान

त्रासाला कंटाळून घेतला निर्णय – घोले 

यानंतर घोले प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘पक्षातील जे वरिष्ठ नेते होते ते सातत्याने त्रास देण्याचे काम करत होते. कटकारस्थान करून आम्हाला त्रास देण्याचे काम सुरू होते. शिवसेना भवनातूनही निरोप येत नव्हते. दोन वर्षांपासून या गोष्टी सातत्याने घडत होत्या. मागील सात ते आठ महिन्यांपासून आम्ही या गोष्टी वरिष्ठांपर्यंत पोहोचवत होतो. परंतु, तरीही यावर काहीच ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे आज हा निर्णय घेतला’, असे घोले म्हणाले.

Tags

follow us