ठाकरेंना धक्का…आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अमेय घोलेंचा शिवसेनेत प्रवेश
Amey Ghole joins ShivSena : मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेवक, माजी सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष, युवा सेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह वर्षा या निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला.
अमेय घोले यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असताना अनेक महत्वाची पदे भूषवली होती. मात्र गेल्या काही दिवसात मनाप्रमाणे काम करण्यास त्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नव्हते. अनेक निर्णय विश्वासात न घेता परस्पर घेतले जात असल्याने त्याबद्दल त्यांच्या मनात नाराजी वाढत चालली होती. याबाबत त्यांनी युवासेनेचे अध्यक्ष, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना याबाबत वारंवार सांगूनही त्याबाबत कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याने त्यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी घोले यांचे पक्षात स्वागत करत त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना घोले यांनी वडाळा परिसरातील अनेक पुनर्विकास प्रकल्प 20 ते 25 वर्षांपासून अपूर्ण असून ते पूर्ण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडाळा परिसरातील सगळे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवू असे सांगून यावेळी त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना आशवस्त केले. राज्यात युती सरकार अस्तित्वात आल्यापासून अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले असून त्याचा फायदा लोकांना होत आहे. मुंबई शहराला खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी साडे सहा हजार कोटींच्या रस्ते कामांना मंजुरी दिलेली आहे.
तसेच शहरात अनेक ठिकाणी सुशोभीकरण करण्याची कामे सुरू असून येत्या काही काळात मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार आहे. आज उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे मुंबई महानगरपालिकेतील 227 जागाच कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने भविष्यात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यास निवडणूका घेण्याचा मार्ग देखील नक्की मोकळा होईल असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी घोले यांच्यासह त्यांच्यासह माजी उपविभाग समन्वयक चित्रा पाटील, उपविभाग समन्वयक सविता देशमुख, स्मिता सावंत, निकिता दळवी, पराग थेवई, उप शाखाप्रमुख नरेंद्र रोकडे, रवी मोडसिंह, रोहित सोनवणे, प्रकाश गुरव, राहुल शिंदे, युवासेना उपविभाग प्रमुख अमेय रावणक, रोहित खेडेकर, सुरेश जाधव उपशाखाप्रमुख उमेश माळी, रमेश थोरात, प्रफुल्ल घाडगे, सागर पवार, कुणाल शेडगे, रोशन शेलार आशा जवळपास 200 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. त्या सर्वांचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षात स्वागत केले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार संजय शिरसाट, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.