अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर राबविलेल्या विशेष (Milk) तपासणी मोहिमेत सर्वाधिक लक्षवेधी कारवाई छत्रपती संभाजीनगर विभागात करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील निलंगेकेंद्र दूध संकलन व शीतकरण केंद्रावर छापा टाकून दूध भेसळीसाठी वापरला जाणारा १,४२५ किलो Whey Permeate Powder आणि ७,५०० लिटर दूध जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आले. या कारवाईत सुमारे ५०.३३ लाख रुपयांचा साठा नष्ट करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तपासादरम्यान हा व्हे पर्मिएट पावडर हैदराबाद येथील दिव्या एंटरप्रायझेस, सरस्वती डेअरी आणि श्रीपदा डेअरी येथून पुरविला जात असल्याचे निष्पन्न झाले. तसेच बालाजी ट्रेडर्स, जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) या पुरवठादारासह दूध संकलन केंद्राचे मालक व्यंकट माने आणि संबंधित व्यक्तींवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
नाशिक विभागात सिन्नर तालुक्यातील रामपूर येथे विनापरवाना साठवलेले ८,३३२ किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. यामध्ये स्किम्ड मिल्क पावडर, व्हे पर्मिएट पावडर, डेअरी पर्मिएट पावडर आणि लॅक्टोज रिच डी-प्रोटीनाईज्ड व्हे पर्मिएट पावडरचा समावेश आहे. भरतपूर येथील मिश्रा स्वीट्समधून ४१ किलो खवा जप्त करून नष्ट करण्यात आला. एका दूध संकलन केंद्राला सुधारणा नोटीस, तर विनानोंदणी दूध वाहतूक करणाऱ्या वाहनालाही आवश्यक परवान्यांपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
पुणे विभागात दौंड येथून ४,१९८ किलो निकृष्ट दर्जाचे बटर व स्किम्ड मिल्क पावडर, आंबेगाव येथून १,४९८ लिटर भेसळयुक्त गायीचे दूध, तर मंचर दूध भेसळ प्रकरणाच्या पुढील तपासात सोलापूर जिल्ह्यातील पिलीव येथून ७,६३४ लिटर गायीचे दूध जप्त करून नष्ट करण्यात आले.
याशिवाय, ३ ते ६ जुलैदरम्यान ८२ हॉटेल, रेस्टॉरंट व ढाब्यांची तपासणी करण्यात आली. ३३ आस्थापनांना सुधारणा नोटिसा, तर ९ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल न्यू अभिजित काळे बंधू आणि पीईएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कँटीन, लातूरमधील हॉटेल मराठवाडा लॉज यांचाही समावेश आहे.
पुणे विभाग : दौंड, आंबेगाव आणि सोलापूरमध्ये कारवाई
दौंड तालुक्यातील पाटस येथे एका आस्थापनातून १,९९१ किलो Pasteurized Cooking Butter आणि २,१९९ किलो Skimmed Milk Powder असा एकूण ४,१९८ किलो निकृष्ट दर्जाचा साठा जप्त करण्यात आला.
आंबेगाव तालुक्यातील रिंगणे येथे १,४९८ लिटर भेसळयुक्त गायीचे दूध जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आले.
मंचर दूध भेसळ प्रकरणाच्या पुढील तपासात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे ७,६३४ लिटर गायीचे दूध जप्त करण्यात आले. हे दूध इंदापूर येथील सोनाई डेअरीकडे पाठविले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून संबंधितांवर कठोर कारवाई सुरू आहे.
हॉटेल व रेस्टॉरंटवरही कारवाई
३ ते ६ जुलैदरम्यान राज्यभर ८२ हॉटेल, रेस्टॉरंट व ढाब्यांची तपासणी करण्यात आली. ३३ आस्थापनांना सुधारणा नोटिसा, तर ९ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले. मुंबईतील फूडविस्टा इंडिया (फ्रेश मेन्यू), पुण्यातील नॅचरल ३६० व हॅपी दा ढाबा, संगमनेरमधील रंगीला पंजाब फॅमिली रेस्टॉरंट, छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल न्यू अभिजित काळे बंधू व पीईएस कॉलेज कँटीन, लातूरमधील हॉटेल मराठवाडा लॉज, नांदेडमधील हॉटेल सवेरा मल्टीक्युझिन यांचे परवाने निलंबित करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील हॉटेल जय महाराष्ट्र हे विनापरवाना सुरू असल्याने ते बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली.
गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांवरही कारवाई
राज्यात ३० धाडी टाकून १.०४ कोटी रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला, गुटखा व इतर पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी १३ एफआयआर दाखल, १२ जणांना अटक, ४ आस्थापने सील आणि ५ वाहने जप्त करण्यात आली.
राज्यभरातील या मोहिमेत १४,०६४ किलो दुग्धजन्य पदार्थ, २४,६३२ लिटर संशयित भेसळयुक्त दूध आणि एकूण ४ कोटी ६३ लाख ३९ हजार रुपयांचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. तसेच प्रतिबंधित पानमसाला, गुटखा आणि इतर अन्नपदार्थांवर ३० धाडी टाकून १.०४ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणांत १३ एफआयआर, १२ जणांना अटक, ४ आस्थापने सील आणि ५ वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.
