केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! आरोपी चेतनच्या वर्गमित्राला पोलिसांनी घेतलं ताब्यात

चेतन चौधरी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल यांनी हत्येचा संपूर्ण आराखडा आपल्या एका वर्गमित्रासोबत आधीच शेअर केला होता.

Untitled Design 75

Untitled Design 75

Major twist in the Ketan Agrawal murder case : पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेस्ट व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या हत्या प्रकरणात दररोजच नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात आणखी एका तिसऱ्या तरुणाचे नाव समोर आल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. हा तरुण मुख्य आरोपी चेतन चौधरीचा वर्गमित्र असल्याची माहिती समोर आली असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. केतन अग्रवाल याच्या हत्येचा कट किती बारकाईने आणि पूर्वनियोजित पद्धतीने रचला गेला होता, याचे नवे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत आहेत. तपासात समोर आलेय माहितीनुसार, मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल यांनी हत्येचा संपूर्ण आराखडा आपल्या एका वर्गमित्रासोबत आधीच शेअर केला होता.

याच वर्गमित्राला 18 जून रोजी लोहगडावर सोबत येण्यासाठी चेतन आणि सियाने वारंवार आग्रह केला होता. मात्र, काही कारणामुळे हा तरुण त्यांच्यासोबत गेला नाही. त्यामुळे तो प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहिला नसल्याची माहिती समोर आली आहे. तापासातील आणखी एक महत्वाचा खुलासा म्हणजे, केतन अग्रवाल याला लोहगडावरून दरीत ढकलल्यानंतर चेतन चौधरी थेट याच वर्गमित्राला भेटला होता. पोलिसांना संशय आहे की, हत्येनंतरची माहिती किंवा कबुली सगळ्यात आधी त्यालाच देण्यात आली असावी. तसेच आरोपी सिया गोयलने देखील या तरुणाशी संपर्क साधून संवाद साधल्याचे माहिती तपासात समोर आली आहे.

मृत्यूंची थट्टा करणारे निर्लज्ज, विरोधकांना तुरुंगात टाकणारे सरकार; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

पोलिसांनी ताब्यात घेतलेला हा संशयित तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरात राहतो. एका नामांकित खासगी कंपनीत तो नोकरी करत असल्याची माहिती आहे. मे महिन्याच्या अखेरीपासून त्याचा चेतन चौधरीशी सातत्याने संपर्क होता आणि त्यांच्यात नियमित संवाद सुरू असल्याचे देखील तपासात उघड झाले आहे. प्राथमिक चौकशीत या तरुणाने पोलिसांना महत्वाची माहिती दिली आहे. चेतन आणि सिया जेव्हा केतनच्या हत्येचा कट रचत होते, तेव्हा केतनचा खून करू नका, असे पाऊल उचलू नका, असा सल्ला आपण त्यांना दिला होता, असा दावा त्याने केला आहे.

मात्र, जर त्याला खुनाचा कट रचला जात असल्याची माहिती होती, तर त्याने ही बाब पोलिसांना किंवा संबंधित यंत्रणांना का कळवली नाही, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तसेच हत्येनंतर चेतन सर्वप्रथम त्यालाच का भेटला? या संवादात नेमके काय घडले? आणि गुन्ह्याची माहिती दडपल्याप्रकरणी ता तरुणावर कायदेशीर कारवाई होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत. या नव्या खुलाशामुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपास अधिक गुंतागुंतीचा झाला असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version