Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचा ताफा शिवनेरी किल्ल्यावर पोहोचला असून, आझाद मैदानावर (Azad Maidan) जरांगेंना पोलिसांनी एक दिवसाची परवानगी दिली आहे. तसेच पाच हजार आंदोलकांनाच उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मात्र, राज्य सरकारच्या या नियमाचे तंतोतंत पालन करत जरांगेंनी मोठी खेळी करत फडणवीस सरकारला चेकमेट करण्याचा डाव टाकला आहे, जरांगेंच्या या खेळीमुळे फडणवीस सरकाराची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
जरांगेंचा डाव नेमका काय?
पोलिसांनी जरांगेंना आझाद मैदानावर 5000 हजार आंदोलकांसह एकच दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, करण्यात येणारे आंदोलन एक दिवसाचे होणार नसल्याचे जरांगेंनी स्पष्ट केले आहे. तसेच आम्ही पोलिसांनी दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून 5 हजार आंदोलकांसह आझाद मैदानात दाखल होणार असल्याचे सांगितले. अन्य मराठा आंदोलक इतर मैदानावर थांबतील.
“आंदोलनाला फक्त एक दिवसाची परवानगी देऊन मुख्यमंत्र्यांनी..”, जरांगेंचा फडणवीसांना रोखठोक इशारा
पाच हजार माघारी फिरले की…
आझाद मैदानावर 5 हजार मराठा आंदोलक माघारी फिरले की, दुसऱ्या मैदानांवर उपस्थित असलेले 5000 हजार आंदोलक नव्याने दाखल होतील. त्यामुळे सरकारच्या अटी आणि शर्तींचे आमच्याकडून तंतोतंत पालन होईल. मुंबईंच्या वेशीवरदेखील मराठे असतील एक जत्था गेल्यानंतर दुसरा जत्था आझाद मैदानावर पोहचेल असेही जरांगेंनी स्पष्ट केले. त्यामुळे आता जरांगेंच्या (Manoj Jaraneg) या खेळीवर राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही! जरांगे पाटील मुंबईत पोहोचण्याआधीच भाजप नेत्यांकडून बॅनरबाजी…
जरांगेंनी हमीपत्रात दिली अनेक आश्वासने
1. आंदोलनासाठी मिळालेली परवानगीची मूळ प्रत पोलीस अधिकाऱ्यांना दाखवली जाईल.
2. पोलिसांशी नियमित संपर्कासाठी जबाबदार व्यक्तीची नियुक्ती केली जाईल.
3. सभास्थळी पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील.
4. धरणे आणि निदर्शने सुव्यवस्थित रीतीने होतील, वाहतुकीत अडथळा येणार नाही.
5. सहभागी व्यक्तींची संख्या निश्चित मर्यादेत राहील.
6. स्वयंसेवक तैनात केले जातील आणि त्यांची यादी पोलिसांना दिली जाईल.
7. आंदोलन ठरवलेल्या ठिकाणीच होईल.
8. आंदोलन सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेतच होईल.
9. ध्वज/फलकाचे आकार आणि काठी निश्चित मर्यादेत राहतील.
10. हिंसक किंवा धोकादायक साधने जवळ ठेवली जाणार नाहीत.
चलो मुंबई म्हणत जरांगे पाटलांची आर-पारची लढाई; वाचा, काय आहे मराठा आरक्षण प्रश्नाचा इतिहास?
11. कोणतीही चिथावणीखोर किंवा विभाजन करणारी भाषा वापरली जाणार नाही.
12. पोलिसांनी दिलेले सर्व कायदेशीर निदेशांचे पालन केले जाईल.
13. सार्वजनिक मालमत्ता किंवा सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला होणार नाही.
14. कोणत्याही प्रार्थनास्थळाची किंवा पवित्र वस्तूची हानी होणार नाही.
15. निर्दिष्ट ठिकाणावरून बाहेर जाणार नाही.
16. कोणतीही कागदपत्रे, प्रतिमा किंवा अन्न जाळले जाणार नाहीत.
17. परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक किंवा जनसंबोधन साधने वापरली जाणार नाहीत.
18. कोणतीही वाहने, प्राणी किंवा वाहनसाधने आंदोलनस्थळी आणली जाणार नाहीत.
19. आयोजकांनी अनुयायांना नियंत्रणाखाली ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
20. हमीपत्रातील नियमांचे पालन पूर्ण केले जाईल आणि पोलिसांना सहकार्य केले जाईल.