जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केलेल्या आंदोलनाला सर्वांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आता हे आंदोलन यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. पण आता कोणीही आंदोलनााला गालबोट लागेल असे कृत्य करु नये. शांततेत रहावे, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये. कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीत राहुनच आंदोलन करावं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. (Manoj Jarange Patil appealed to maratha community that not to do anything that would cause a backlash to the movement)
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील माडज येथील किसन माने या तरुणाने मराठा आरक्षणासाठी तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी सर्व मराठा समाजाला शांतता आणि संयम राखण्याचं, कोणतही टोकाचं पाऊल न उचलण्याची विनंती केली. ते जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील आंदोलन स्थळावरुन माध्यमांशी बोलत होते.
आज 12 वाजेपर्यंत सरकारचा चर्चेसाठीचा निरोप येणार होता. पण अद्याप सरकारचा कोणताही निरोप आलेला नाही. आम्ही रात्रीपासूनच बॅगा भरुन ठेवल्या आहेत. आमचे शिष्टमंडळ तयार आहे. आता आम्ही उद्यापर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत. उद्यापर्यंत काय होतयं बघणार अन्यथा, उद्यापासून सलाईन काढणार आणि पाणीही घेणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.
काल (7 सप्टेंबर) निजामकालीन नोंदी असणाऱ्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय घेऊन माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आंदोलस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. मात्र हा शासन निर्णय अपूर्ण आहे. आमच्याकडे कोणाकडेही वंशावळीच्या नोंदी असलेल्या पुरावे नाहीत. त्यामुळे याचा आम्हाला एक टक्काही फायदा होणार नाही, अशी भूमिका घेत यात सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र असा शब्द हवा आहे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
यावर खोतकर यांनी जरांगे पाटील यांना मुंबईत येऊन चर्चा करण्याचे निमंत्रण दिले. ते म्हणाले, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येऊन चर्चा करण्याचे आमंत्रण देतो. त्यांनी जीआर नाकारला असला तरी त्यांना जे बदल सुचवायचे आहेत, ते त्यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर, वर्षा बंगल्यावर किंवा मंत्रालयात येऊन सुचवावेत. जर त्यांना शक्य नसेल तर त्यांनी शिष्टमंडळ पाठवावे, असे सांगितले. हे आमंत्रण जरांगे पाटील यांनी स्वीकारले आहे. मात्र अद्याप सरकारकडून कोणताही निरोप आलेला नाही.