Manoj Jarange : मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांच्या तोडफोडीची घटना आज सकाळी घडली. या घटनेने खळबळ उडाली असून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. या तोडफोडी प्रकरणात सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया देत तोडफोडीचे समर्थन करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. मनोज जरांगे म्हणाले, मला काहीच माहिती नाही. मी आताच झोपेतून उठलो. मराठा शांततेत आंदोलन करत आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे. कुणी जर गाडी फोडली असेल तर त्याचे समर्थन होणार नाही. सरकारने आता आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजात अजूनही माणुसकी जिवंत आहे. समाजाने सरकारचे खूप लाड केले. समाजातील कोण कोण श्रद्धेय मराठ्यांना आरक्षण मिळू देत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. मराठ्यांनी मोठं केल्यामुळे त्यांची मुलं श्रीमंतीत जगतात. ते स्वतः विमानात फिरतात. सगळ्याच राजकीय पक्षातील, सत्तेतील लोक मराठ्यांना मोठं होऊ देत नाहीत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
जरांगे पाटलांना अटक करा – सदावर्ते
या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटलांच्या शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे का, असा सवाल त्यांनी केला. मला कुणीच शांत करणार नाही. माझ्या घराजवळ येऊन वाहनांची तोडफोड केली. झेपणार नाही आणि पेलणारही नाही असे जरांगे पाटील म्हणत होते ते हेच का, असे सवाल सदावर्ते यांनी उपस्थित केले. माझ्या घरासमोर येऊन काही लोकांनी रेकी केली होती. एका चॅनेलनं हे दाखवलं. हे षडयंत्र आहे. पण, मी थांबणारन नाही. माझं सरकारला म्हणणं आहे की एकट्या जरांगेंचे ऐकू नका. आमचंही ऐका. महाराष्ट्रातील या घटनांची सुरुवात ही पोलिसांवरील हल्ल्यापासून झाली. ती माझ्या घरावर आली आहे. जरांगेंना आता अटक करा. त्यांच्या मुसक्या आवळा, अशी मागणी सदावर्ते यांनी केली.
Maratha Reservation : ‘आमची शांतताच सरकारला जेरीस आणणार’; जरांगे पाटलांची पुन्हा डरकाळी
नेमकं काय घडलं ?
मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणाही दिल्या. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल पोलिसांकडून गुन्हाही दाखल होऊ शकतो.