Download App

जरांगे पाटलांकडून पुन्हा उपोषणाचा एल्गार! गिरीश महाजनांची अखरेच्या क्षणापर्यंतची शिष्टाई निष्फळ

जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. आता आरक्षण मिळेपर्यंत ना अन्, ना पाणी ना वैद्यकीय उपचार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाला मान देऊन 40 दिवसांची मुदत दिली होती, आज 41 वा दिवस आहे, पण त्यांनी शब्द पाळलेला नाही, त्यामुळे आजपासून पुन्हा एकदा उपोषणाची सुरुवात करत असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. (Maratha reservation agitator Manoj Jarange Patil has once again announced a hunger strike)

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत काल (24 ऑक्टोबर) संपली. त्यानंतर आज  जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी याबाबतची घोषणा केली.

प्रत्येक वेळी कानफाट फोडलेय, पण निर्लज्जपणाने गाल चोळत…; ठाकरेंनी नार्वेकरांना फटकारले !

यावेळी जरांगे पाटील म्हणाले, आधी 17 दिवसांचे उपोषण केले, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांच्या शब्दानंतर आपण 40 दिवसांची मुदत दिली. पण या काळात त्यांनी आरक्षण दिले नाही. आम्ही त्यांच्या शब्दाचा मान ठेवला, मग आमचं काय चुकलं? आमच्या मुलांची आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांना आरक्षण आहे, पण आम्हालाच आरक्षणापासून डावललं जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

शासनाशी संवाद बंद, नेत्यांना गावबंदी :

यावेळी जरांगे पाटील यांनी आता आरक्षणाचा जीआर घेऊन येत नाही तोपर्यंत शासनातील कोणाशीही संवाद साधणार नसल्याच सांगितलं आहे. सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करत असल्याचही त्यांनी सांगितलं. कोणी नेता आला तर त्याला शांततेत परत पाठवा, कुठेही दंगा करु नका. उग्र आंदोलन, जाळपोळ होणार नाही याची काळजी घ्या. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन यावेळी त्यांनी मराठा समाजाला केले.

Road Accident : दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या शिवसैनिकांचा भीषण अपघात; 25 जखमी

गिरीश महाजनांचा जरांगे पाटलांना फोन :

सकाळी अकरा वाजता जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र यापूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारतर्फे बोलणी करण्यासाठी जरांगे पाटील यांना फोन केला आणि उपोषणाची घोषणा न करण्याची विनंती केली. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ही सरकारची प्रामाणिक भावना आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नही करत आहे. मात्र न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यायचे असल्याने काहीसा वेळ लागत आहे. मी मुख्यमंत्री महोदयांशी तुमचे बोलणे करुन देतो, असे सांगत महाजन यांनी जरांगे पाटील यांची समजुत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरवत जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली.

 

Tags

follow us