Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाला आज मोठे यश मिळाले. मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मान्य झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत (Eknatgh Shinde) उपोषण मागे घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले. यानंतर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या आंदोलनानंतर ओबीसी नेत्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा तीव्रतेने लढला. समाजबांधवांनीही त्यांना मोठा प्रतिसाद दिला. एक प्रकारे त्यांनी ही लढाई जिंकली. परंतु, तहात मात्र ते हरले असेच चित्र आता उभे राहिले आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली.
मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश मिळाले असले तरी निश्चितच मंत्री छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे आणि ओबीसींच्या लढ्याला अपयश आले आहे. सरकारने ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर भूकंपाचे धक्के दिले आहेत, असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला. आता ओबीसीही सरकारला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राठोड यांनी दिला. वंचित, बहुजन आणि बारा बलुतेदार समाजाच्या ताटातील 17 भाकरींमध्ये वाटेकरी होऊन मराठा समाजाने कोणता विजय मिळवला? असा सवाल राठोड यांनी उपस्थित केला.
मनोज जरांगे हे मनुवादी, मुंबईच्या आंदोलनात घातपात’ उपराकार लक्ष्मण मानेंचे धक्कादायक दावे
सध्या आंदोलन स्थगित करतोय – मनोज जरांगे
दरम्यान, आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सरकारने मोठा संघर्ष केला. आरक्षणासाठी अखेर आम्हाला मुंबईची वाट धरावी लागली. मराठे इतक्या ताकदीने मुंबईत आले की सरकारला आमच्या मागण्या मान्य करून अध्यादेश काढावा लागला. मराठा समाजाच्या ताकदीमुळेच अध्यादेश निघाले आहेत. अन्यथा आदेश निघाले नसते. आंदोलन संपलेले नाही तर सध्या आंदोलन स्थगित करत आहोत, असे जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाज मुंबईकडे निघाला तसे अध्यादेश निघत गेले. हा मराठा समाजाचा विजय आहे. गुन्हे मागे घेण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. सगेसोयरे यांच्याबाबतही अध्यादेश काढण्यात आला आहे. सात ते आठ अध्यादेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे आम्ही समाधानी आहेत, असे जरांगे पाटील म्हणाले. यानंतर सध्या आंदोलन स्थगित करत असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत वाशी येथे सभा घेण्यात आली.
‘तोपर्यंत मी कुणबी नोंदीचा लाभ घेणार नाही’ मनोज जरांगे सरसकट आरक्षणावर ठाम