मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; आता 41 उमेदवारांच्या निकालाकडे लक्ष

41 उमेदवारांच्या लढतीत मतदानाचा टक्का घटला, आता 27 ऑक्टोबरच्या निकालातून मतदारांचा नेमका कौल स्पष्ट होणार आहे.

News Photo   2026 10 24T141156.169

Marathwada Graduate Constituency Election

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी (Election) शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान पार पडले. विभागातील आठही जिल्ह्यांमधील ८४२ मतदान केंद्रांवर शांततेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. एकूण ३ लाख २६ हजार ७०० मतदारांपैकी १ लाख ९१ हजार ६८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, मतदानाची अंतिम टक्केवारी ५८.६७ इतकी नोंदवण्यात आली. धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ६२.५३ टक्के मतदान झाले, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात कमी ५५.७३ टक्के मतदानाची नोंद झाली. मागील निवडणुकीत ६४.७९ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा मतदानात सुमारे ६ टक्क्यांनी घट झाली आहे.

या निवडणुकीत तब्बल ४१ उमेदवार मैदानात असल्याने मतपत्रिकेचा आकारही मोठा होता. शुक्रवारी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत मतदारांचा प्रतिसाद कमी दिसून आला. सकाळी १० वाजेपर्यंत विभागात केवळ ६.५२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत मतदानाचा वेग वाढला आणि दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण मतदानाची टक्केवारी २०.८४ वर पोहोचली. दुपारनंतर मतदानासाठी मतदारांची गर्दी वाढत गेली. दुपारी १२ वाजेपर्यंतच्या टप्प्यातील आकडेवारीनुसार पुरुषांचे मतदान ३८.४३ टक्के, महिलांचे २८.३२ टक्के, तर इतर मतदारांचे मतदान १.६९ टक्के नोंदवण्यात आले होते.

एकदाच वापरायची वैद्यकीय उपकरणं पुन्हा वापरल्यास कारवाईचा इशारा, केंद्र सरकारचे रुग्णालयांना निर्देश

मतदानाची वेळ संपण्याच्या अखेरच्या टप्प्यात अनेक केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. त्यामुळे काही ठिकाणी मतदानाची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू राहिली. सर्व जिल्ह्यांतील मतदानाची एकत्रित आकडेवारी प्रशासनाला रात्री उशिरा प्राप्त झाली. आता या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, येत्या २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील वुडस्टर्म डेकार कंपनीच्या ठिकाणी मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी ४ हजार ४५५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून यंदा ४१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सतीश चव्हाण हे या निवडणुकीत पुन्हा एकदा रिंगणात उतरले होते. यापूर्वी सलग तीन वेळा विजय मिळवलेल्या चव्हाण यांच्यासाठी ही चौथी निवडणूक आहे. मतदारांचा घटलेला प्रतिसाद आणि उमेदवारांची मोठी संख्या यामुळे निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे. २७ ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीनंतर मराठवाड्यातील पदवीधर मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला, हे स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version