छत्रपती संभाजीनगरमधील मैत्रिला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. (Beed) मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर सांत्वनपर भेटण्यास आलेल्या मैत्रिणीने घरातील ४९ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना तीन डिसेंबरला दुपारी साडेतीन ते साडेनऊच्या दरम्यान जाधववाडी घडली. याप्रकरणी पैसे चोरून नेणाऱ्या मैत्रिणीविरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. ज्योती बनकर असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार वंदना सुनील जाधव (४०, रा. जाधववाडी) या फिर्यादी आहेत. त्या स्वयंपाकाचे काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मुलाचे रिक्षा अपघातात निधन झाले होते. अपघातग्रस्त रिक्षा हा वंदना यांची मैत्रीण ज्योती बनकर हिच्या ओळखीचा होता. त्यामुळे ज्योती ही ३ डिसेंबरला फिर्यादी वंदना यांना सांत्वनपर भेटण्यासाठी घरी गेली होती.
धक्कादायक! महिलेचं काम देण्याच आश्वासन, बारामतीच्या मुलीवर बीडमध्ये सामूहिक अत्याचार
दरम्यान, बहिणीच्या भिशीचे ३० हजार रुपये, फिर्यादीच्या पगारातून आलेले १० हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे नऊ हजार रुपये असे एकूण ४९ हजार रुपये फिर्यादी डब्यात ठेवत असताना आरोपी ज्योती हिने ‘असे मोकळे पैसे नको ठेवू म्हणत फिर्यादीला रबर मागितला आणि रबर लावून पैसे फिर्यादीच्या हातात दिले. त्यावर फिर्यादी वंदना यांनी रबर लावलेले पैशांचे बंडल स्टीलच्या डब्यात ठेवले. पैसे कुठे ठेवले हे ज्योती हिने पाहिले होते.
ज्योती ही साडेतीन वाजेपासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत फिर्यादीच्या घरी थांबली होती. साडेनऊ वाजता फिर्यादी वंदना या वॉशरुमला गेल्या असता आरोपी ज्योती हिने स्टीलच्या डब्यातील ४९ हजार हजार रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. काही वेळाने फिर्यादीने ज्योतीला फोन केला असता, ती सिडको बसस्थानक परिसरात असल्याचे म्हणाली. नंतरही फोन केला असता, तिने पैसे परत करते म्हणत फोन बंद करून ठेवला. ती पैसे परत देत नसल्याने फिर्यादीने १५ डिसेंबरला हर्सूल पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तपास सहायक फौजदार काकडे करत आहेत.
