मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख (Deshmukh) यांचे बंधू असलेल्या धनंजय देशमुख यांच्यावर बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोक्याला बंदूक लावून आपल्याला जीवे मारण्याच्या हेतूने धनंजय देशमुखने प्रयत्न केल्याचं तक्रारीत म्हटलं असून या प्रकारामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी धनंजय देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत भावाच्या न्यायासाठी रान उठवले होते. आपल्या भावाची झालेली निर्घृण हत्या माणुसकीला काळिमा फसणारी असून यातील दोषीवर कठोर कारवाई व्हावी आणि आरोपीच्या संबंधित गँगवर अनेक धक्कादायक आरोप धनंजय देशमुखच्या वतीने सतत सुरू होते. मात्र आता धनंजय देशमुख यांच्यावरच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
पोटनिवडणुकीत वहिनी का हरल्या?, धनंजय देशमुख यांनी सांगितलं राजकारण
रवीराज साबळेंचाही उल्लेख
ग्रामीण पोलिसांकडे समाधान खिंडकर (वय-३०, व्यवसाय मजुरी रा. बेलवाडी) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, “मी आणि माझे मित्र दीपक रसाळ, योगेश मनेरी व दीपकच्या आणखी एका मित्रासोबत मोटारसायकलवर बीड बायपास रोडवरील हॉटेल शेतकरी येथे जेवणासाठी गेलो होतो. यावेळी रीलस्टर रवीराज साबळे हे देखील त्यांच्यासोबत हॉटेल शेतकरी राजा येथे जेवण करण्यासाठी आले होते.
मी माझ्या मोबाईलवरून रवीराज साबळे यांना इन्स्टाग्रामवरील लाइव्ह दाखवत असताना धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने माझ्या हातातून मोबाईल घेतला. तेव्हा तुम्ही माझा फोन का घेतला असं मी म्हणताच धनंजय देशमुख हे पाठीमागून पळत आले आणि मला म्हणाले की, तू विनाकारण आमच्या वाकड्यात घुसू नकोस, माझ्याकडं एवढा पैसा आहे की मी चालता-चालता तुला संपवून टाकीन.
पुढं देशमुख यांनी अंगरक्षकाच्या कमरेचे पिस्तूल काढून जिवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या डोक्याला लावलं आणि मला म्हणाले की, तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर मला शिवीगाळ करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असं समाधान खिंडकर याने आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. दरम्यान, याप्रकरणात बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.
