संतोष देशमुख यांच्या हत्येला आज वर्ष पूर्ण, काय म्हणाले बंधू धनंजय देशमुख?
संतोष पंडितराव देशमुख यांचं ९ डिसेंबर २०२४ ला अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Beed) यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्या क्रूर घटनेला आज वर्ष पूर्ण झालं. या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं. तेव्हापासून संतोष देशमुख यांचे कुटुंबीयांकडून तसेच विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पुढे मुंडे यांचा राजीनामा झाला. सध्या यातील एक आरोपी फरार असून बाकी अटक आहेत.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं ९ डिसेंबर २०२४ ला अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या झाली, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं तेदेखील कुटुंबीयांनी सांगितलं होतं. दरम्यान, आजही आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत अशी प्रतिक्षा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
ज्यावेळी आमच्या गावात फिरता तेव्हा आमच्या भावना कळतील. आई सकाळपासून रडते आहे की वर्षभरापासून वाट पाहते आहे, की दादा कुठं आहे? आज एक वर्ष झालं आहे. न्याय मिळायला हवा होता आणि आऱोपींना फाशी व्हायला हवी होती. पण आरोप फ्रेम व्हायचे आहेत. या प्रकरणातला फरार आरोपी कुठे आहे असा आमचा सवाल आहे. पोलीस खात्यातले काही लोक आरोपींना मदत करत होते. त्यांना शिक्षा व्हायला हवी असंही ते म्हणाले.
मी माझ्या भावाच्या विचारांवरच वाटचाल करतो आहे. ज्या दिवशी आरोपींना फाशी होईल आणि त्यांना मदत करणाऱ्या पोलिसांना शिक्षा केली जाईल तीच माझ्या भावाला श्रद्धांजली ठरेल. मी माझ्या भावाचा विचार कधीही संपू देणार नाही असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आज येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासह अनेकांनी मस्साजोग या गावी भेटी दिल्या आहेत.
