Beed LoK Sabha Pankaja Munde VS Bajrang Sonwane : राज्यात चौथ्यात टप्प्यात अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. भाजपच्या (bjp) नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde) आणि शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे ( Bajrang Sonwane) यांच्यातील तुल्यबळ लढतीमुळे बीड लोकसभा मतदारसंघ राज्यभरात चर्चेत आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा थेट परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत उघडपणे दिसून आला आहे. या मतदारसंघात विक्रमी सुमारे 71 टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा मताचा टक्का पाच टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वेळी 65 टक्के मतदान झाले होते. ही वाढलेले मतदान पंकजा मुंडें की बजरंग सोनवणे यांच्या पथ्थ्यावर पडणार हे चार जूनला इव्हीएम मशीन उघडल्यानंतर समोर येईल.
कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान?
बीड लोकसभा मतदारसंघात 70. 92 टक्के मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यातील सर्वाधिक मतदान बीडमध्ये झाले आहे. 15 लाख 19 हजार मतदारांनी मतदानाचा हक्का बजाविला आहे. या मतदारसंघात सर्वाधिक 74. 79 टक्के मतदान आष्टी विधानसभा क्षेत्रात झाले आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात 71 टक्के मतदान झाले आहे. बीड शहरात कमी मतदान झाले आहे. या शहरात 66 टक्केच मतदान झाले आहे. गेवराई, माजलगाव, केज या तीन विधानसभा क्षेत्रात 71 टक्कांच्या आसपास मतदान झाले आहे.
नेत्यांची ताकद मुंडेंच्या मागे पण मतदार
या मतदारसंघात अजित पवार गट, भाजपची मोठी ताकद आहे. शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी केवळ संदीप क्षीरसागर यांची ताकद होती. अजित पवार गटाचे आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे, धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके, भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार, केजच्या आमदार नमिता मुंदडा अशा पाच आमदारांची ताकद मुंडेंच्या पाठीशी होती. मराठा नेते बरोबर असले तरी मराठा मतदान ते खेचण्यात यशस्वी झालेले नाहीत, असे उघडपणे बोलले जात आहे.
भुमरे आणि जलील यांना खैरे चितपट करणार?, ‘ही’ आहेत कारणं
जरांगे फॅक्टर, मोदी, पवार सभा
या मतदारसंघात मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे यांनी मोठे समर्थन मिळाले होते. या ठिकाणी उघड-उघड ओबीसीविरुद्ध मराठा अशी लढत झाली आहे. यापूर्वी कधीही जातीचे ऐव्हढे राजकारण झाले नाही, असे खुद्द पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत हे बोलून दाखविले आहे. मराठा समजााला गोपीनाथ मुंडे यांनी कशी मदत केली, असे जाहीरपणे मुंडें यांच्याकडून सांगून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न झाला आहे. मोदी यांची सभा झाली आहे. परंतु निवडणूक थेट जातीवर गेल्यामुळे मोदींचा सभेचा किती फायदा होईल हा एक महत्ताचा मुद्दा आहे. बीडमध्ये मोदी यांनी मुस्लिम समाजाविरोधात भाषण केले होते. त्या आधी पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात मुस्लिम समाजाच्या केसाला दहा वर्षात धक्का लागला नाही, असे सांगून मुस्लिम समाजाची साथ मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यातून मुस्लिम समाज हा सोनवणे यांच्या पाठीशी दिसून आला. तर शरद पवार यांनी एका सभेमध्ये थेट जरांगे यांचे समर्थन करणारेच विधान केले होते. जरांगे हे शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे जात असतील, तर त्यांना साथ दिली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. त्यामुळे एकप्रकारे मराठा मतदार सोनवणे यांच्या पाठीशी जास्त वळावे, असाच प्रयत्न पवारांचा होता. हा प्रयत्न यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे.
मतदान का वाढले?
आष्टी मतदारसंघात सर्वाधिक 75 टक्के मतदानाचे वेगवेगळे कारणे समोर येत आहेत. या मतदारसंघात आजबे, विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस आणि भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे या लोकांच्या ताकदीमुळे हे मतदान खेचून आणल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघ मराठा मतदार जास्त असल्याने मतदान जास्त झाल्याचे कारणे दिली जात आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात स्थलांतर मतदारांची संख्याही जास्त आहे. चुरशीची निवडणूक असल्याने दोन्ही उमेदवारांकडून बाहेरील शहरातून मतदार आणून मतदान घडवून आणले आहे. काही मतदार स्वताःहून आले आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला आहे
पंकजा मुंडेंना धाकधूक
वाढलेले मताधिक्क, जाती राजकारण यामुळे बीड लोकसभा मतदारसंघाचे गणित बिघडल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघात मागील वेळा प्रितम मुंडे यांच्याविरुद्ध बजरंग सोनवणे यांना तब्बल पाच लाख मते मिळाली होती. यंदा मोदींची नसलेली लाट, मराठा समाज, मुस्लिम समाज हा विरोध आहे. गेल्या वेळेस बजरंग सोनवणे यांना पाच लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. त्यामुळे अनेक फॅक्टर बजरंग सोनवणेंसाठी फायद्याचे आहेत. परंतु पंकजा मुंडे यांच्या पाठीशी ओबीसी समाज भक्कमपणे उभा राहिला आहे. त्यामुळे दोघांचे पारडे हे सम-समान आहे, असे स्थानिक राजकीय विश्लेषक सांगतात. निवडून येणारे उमेदवाराचे लीड हे पन्नास हजारांपेक्षा कमी राहिल असे बोलले जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची राजकीय प्रतिष्ठापणाला लागली आहे. या राजकीय चर्चा असल्या तरी प्रत्यक्षात मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिलाय चार जूनलाच पुढे येईल.
Lok Sabha Election : अमित शाहांचा मोठा दावा! म्हणाले, भाजप 270 प्लस जाणार