Download App

Loksabha Election: ज्योती मेटे या पंकजा मुंडेंचे गणित बिघडविणार?

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Beed Lok Sabha constituency : भाजप नेत्या पंकजा मुंडे ((Pankaja Munde) या पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या (Loksabha Election) आहेत. देशभरात भाजपचे वारे आहे. राज्यात भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद मदतीला आहे. बीडमध्ये पंकजा यांचा ज्याच्याशी संघर्ष होता, तो भाऊच म्हणजे धनंजय मुंडे (Dhanjay Munde) आता प्रचारप्रमुख आहेत. त्यामुळे पंकजा यांचे फक्त विजयाचे लिडच मोजायचे आहे, असे सारे गणित वरवर कोणाच्याही लक्षात येईल. बीड हा मुंडेंचा घरचा मतदारसंघ आहे. त्यामुळे त्यांना येथे कोण अडविणार, असाही प्रश्न बाहेरच्या व्यक्तीला पडू शकतो. (Beed Lok Sabha constituency)

पण खरेच पंकजा यांच्यासाठी ही सहज आणि सोपी निवडणूक आहे? याचा शोध यानिमित्ताने घेऊ. महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे आला आहे. शरद पवारांकडे ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे असे दोन पर्याय आहेत. त्यातील मेटे यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे.  राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांनी अद्याप आपला निर्णय दिलेला नाही. बीडमधील सामाजिक समीकरणे लक्षात घेतली तर या मतदारसंघावर वंजारी समाजाचा मोठा प्रभाव आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यावर मनापासून प्रेम करणारी पिढी या ठिकाणी आहे. त्यांचा राजकीय वारसदार असलेल्या पंकजा याच या मतदारसंघात भाजपच्या उमेदवार आहेत. दुसरीकडे वंजारी समाजापेक्षा काही हजाराने जास्त मराठा मतदार आहे. याशिवाय दलित आणि मुस्लिम यांचीही संख्या समीकरणांवर प्रभाव टाकणारी आहे.

’24 तास मोफत वीज, मोहल्ला क्लिनिक…’; केजरीवालांनी जेलमधून जनेतला दिल्या ६ हमी

मेटे यांच्याविषयीची सहानुभूती

राष्ट्रवादीकडून ज्योती मेटे या रिंगणात उतरविणे याचा अर्थ या मतदारसंघात वंजारी आणि मराठा असे मतांचे ध्रुवीकरण होण्याची ती खेळी असू शकते. याच ध्रुवीकरणावर पुढील समीकरणे फिरू शकतात. शिवसंग्राम या मराठा संघटनेचे अध्यक्ष असलेल्या विनायक मेटे यांच्या ज्योती या पत्नी. विनायक मेटे यांचे अकाली अपघाती निधन झाल्याने या संघटनेची सूत्रे ज्योती मेटे यांच्याकडे आहेत. विनायक मेटे यांनी आपली सारी राजकीय कारकिर्द कधी मुंडे तर कधी पवार यांच्या मदतीने जिवंत ठेवली. मुंडे यांच्या निधनानंतर मेटे हे फडणवीस यांच्याशी सलगी ठेवून होते. आपल्या राजकीय संपर्काच्या बळावर आणि आमदारकीच्या साह्याने मेटेंनी आपले निष्ठावान कार्यकर्ते बीडमध्ये उभे केले. या कार्यकर्त्यांचे नेटवर्क ज्योती मेटे यांना उपयोगी पडू शकते. मेटे यांच्या निधनानंतरची सहानभूती मिळविण्यासाठीह ज्योती मेटे यांची उमेदवारी उपयोगात येऊ शकते विनायक मेटे हे मराठा नेते म्हणूनच परिचित होते. त्यामुळे तेथील मराठा मतांच्या ध्रुवीकरणाचे गणितही साधले जाते.

स्थानिक समीकरणे गणिते बिघडविणारी

बीडमधील सहापैकी पाच आमदार हे आता पंकजा यांच्यासोबत आहेत. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी फळी त्यांच्या सोबतीला आहे. ज्योती मेटे यांना बीड शहराचे आमदार संदीप क्षीरसागर यांचेच सहकार्य मिळू शकते. त्यामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्ते नसणे ही ज्योती मेटे यांची मोठी अडचण आहे. पण पंकजा यांच्याकडे नेत्यांची गर्दीच गर्दी असणे ही डोकेदुखी होऊ शकते. उदाहरणार्थ गेवराईमध्ये भाजपचे लक्ष्मण पवार हे आमदार आहेत. येथे राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांच्याशी त्यांचा संघर्ष राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचे जमायचे कसे हाच खरा प्रश्न आहे. प्रत्येक तालुक्यात अशी कसोटी पाहणारी समीकरणे आहेत.  त्यातून मग दुखावलेला गट हा सोईने शरद पवारांच्या उमेदवारांचा काम करू शकतो. सुरेश धस यांच्यासारखा नेता धनंजय मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारेल का हा देखील प्रश्नच आहे.

जरांगे फॅक्टरचा प्रभाव

बीड लोकसभा मतदारसंघात मनोज जरांगे हा फॅक्टर सर्वाधिक चालणारा आहे. पंकजा यांना याचाच जास्त धोका आहे. जरांगे यांचे आंदोलन आंतरवली सराटी या जालना जिल्ह्यातील गावात चालले. पण त्याचे सर्वाधिक पडसाद हे बीड जिल्ह्यात उमटले. नेत्यांची घरे जाळण्याच प्रकार हे बीडमध्येच झाले. त्यामुळे या आंदोलनाची धग येथील राजकारणात अजूनही टिकून आहे. जरांगे यांनी थेट राजकीय भूमिका घेतलेली नाही. तुम्हाला ज्याला पाडायचे त्याला पाडा, असा संदेश त्यांना दिला आहे. बीडमध्ये आंदोलन आणि जाळपोळ केल्याने तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे तेथील वातावरण या मुद्यावर संवेदनशील आहे. जरांगे यांच्या विरोधात ओबीसी नेत्यांनी मोठ्या सभा घेतल्या. त्या सभांपासून दूर राहण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला होता. जरांगेप्रणित मराठा आंदोलक हे ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांच्याविरोधात आहेत, तसे पंकजा यांच्याबाबतीत अजिबात नाही. तरीही मराठा आंदोलनाच्या निमित्ताने फायदा करून घेण्यासाठीच ज्योती मेटे यांची उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादीचे डावपेच आहेत.

Girish Mahajan : बंडखोरीवरून जुंपली! “बंडखोरांना रोखता येत नाही”; महाजनांचे गुलाबरावांना प्रत्युत्तर

दलित आणि मुस्लिम मते निर्णायक

बीड लोकसभा मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मते निर्णयावर प्रभाव पाडणारी आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या युतीच्या उमेदवाराला सुमारे ९० हजार मते मिळाली होती. या निवडणुकीत वंचित आणि एमआयएमची युती नाही. वंचित या वेळी आपला उमेदवार रिंगणात उतरविणार आहे. हा उमेदवार किती मते घेणार यावरही विजयी उमेदवाराच्या मताधिक्यात मोठा फरक पडू शकतो. २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर प्रीतम मुंडे यांना ६ लाख ७८ हजार मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांना ५ लाख ९ हजार मते होती. दोघांच्या मतात सुमारे १ लाख ६८ हजारांचा फरक होता. वंचितचा उमेदवार नसता तर सोनवणे यांची मते आणखी वाढली असती, असा ढोबळ निष्कर्ष काढता येतो. ही मते भाजपवर नाराज आहेत, असे महाराष्ट्रातील अनेक मतदारकल चाचण्यांतून दिसून आले आहे. तसे असेलच तर त्याचा परिणाम बीडमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही.

पंकजा यांची स्थिती भक्कम! तरीही…

ही सारी स्थिती पाहिली तर आधी म्हटल्याप्रमाणे पंकजा यांचे विजयाचे गणित कागदावर भक्कम आहे. विरोधात असलेली राष्ट्रवादी फुटलेली आहे. त्यामुळे निर्धास्तपणे पंकजा निवडून येतील, अशीही स्थिती नाही. त्याचे कारण ज्योती  मेटे यांची उमेदवारी  काही अंडरकरंट   सांगणारी असू शकते. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असे तिघे एकत्र आले तर पंकजा यांना ६० टक्क्यांहून अधिक मते मिळायला हवीत. पण राजकारणात नेते एकत्र आले म्हणजे मतदारही त्याच पद्धतीने मतदान करतात, असे नाही.  हिंदुत्व, राम मंदिर, मोदींची हॅटट्रीक, विश्वगुरू अशा राष्ट्रीय मुद्यांवर भाजपचा भर आहे. गोपीनाथ मुंडेंची कन्या म्हणून साथ द्या, हा भावनिक मुद्दाही पंकजा यांच्या मदतीला आहे. पण बीडसारख्या जिल्ह्यात वेगळेच मुद्दे डोके वर काढतात. यासाठी ज्योती मेटेंची उमेदवारी ही या मतदारसंघातील शरद पवार यांची मोठी खेळी ठरू शकते. फक्त विरोधी उमेदवार द्यायचा म्हणून तो द्यायचा, एवढाच हेतू ज्योती मेटेंच्या उमेदवारीमागे नाही. तरी पंकजांना त्यांची कागदावरची गणितांची पुन्हा फेरमांडणी करायला लावणारी ती पवारांची खेळी आहे, एवढे मात्र निश्चित.

 

follow us

वेब स्टोरीज