Download App

“..तर आगामी निवडणुकीत ओबीसी सरकारला उत्तर देतील, मनोज जरांगेंना”, हाकेंचा इशारा कुणाला?

Laxman Hake Criticized Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 29 तारखेला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नियोजन त्यांच्याकडून सुरू आहे.  गावागावात बैठका घेतल्या जात आहे. दुसरीकडे सरकारी पातळीवरही हालचाली सुरू आहेत. याच मुद्द्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मुंबईत जाऊन आता मुंबई जाळायची आहे का?  असा सवाल हाके यांनी केला आहे. तसेच येत्या 29 तारखेला जरांगे यांना आंतरवाली सराटीतच आंदोलन किंवा उपोषण करू द्या. त्यांना मुंबईत येऊ देऊ नका, अशी विनंती राज्य सरकारला आहे, असे हाके यांनी सांगितले.

हाके सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते बीड जिल्ह्यात आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. राज्य सरकारलाही स्पष्ट शब्दांत इशारा दिला. हाके पुढे म्हणाले, गेल्या आठवडाभरापासून मी सातारा, सांगली या जिल्ह्यांत फिरलोय. काल मी बीड जिल्ह्यातील शिरुरकासार तालुक्यात फिरलो आहे. आज मी गेवराई तालुक्यात जातोय. उद्या मी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड परिसरात जात आहे. नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतही जाणार आहे.

..तर ओबीसी सरकारला नक्कीच प्रत्युत्तर देतील

या दौऱ्यात मी ओबीसी बांधवांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांची काय मतं आहेत हे जाणून घेत आहे. जरांगे मुंबईला जात आहेत म्हणून आम्ही प्रति आंदोलन आजिबात देणार नाही. आम्ही राज्यातील ओबीसी बांधवांना एकत्र करण्याचा प्रयत्न करू. जरांगेंच्या झुंडशाहीला बळी पडून सरकारने काही वेडावाकडा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला इथला ओबीसी प्रत्युत्तर नक्कीच देईल. मग ते सरकार कुणाचं आहे कोणत्या पक्षाचं आहे याच्याशी आमचं काहीही देणंघेणं राहणार नाही. आगामी पंचायत राजच्या निवडणुकीत गावगाड्यातला ओबीसी या सरकारला किंवा विरोधकांना जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.

29 ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन; मनोज जरांगेंकडून राजकीय नेत्यांना थेट इशारा

आता मुंबई जाळायची आहे का?

ओबीसी हा कधीही कुणाला चेतावनी देत नाही किंवा राज्यातलं वातावरण बिघडवत नाही. राज्यातलं वातावरण बिघडवलं कुणी? बेकायदा मागण्या केल्या कुणी? ओबीसी नेत्यांना कुणी टार्गेट केलं? ओबीसींची घरंदारं कुणी जाळली? ओबीसींच्या लोकांवर कुणी हल्ले केले? मग आता 29 तारखेला मुंबईत जाऊन ह्यांना मुंबईची जाळपोळ करायची आहे का? असा संतप्त सवाल हाके यांनी विचारला.

राज्याच्या गृह विभागाला माझं सांगणं आहे की तुमच्याकडे गुप्तचर विभागाचा रिपोर्ट असेलच ह्या जरांगेंना आंतरवाली सराटीत उपोषण करू द्या, आंदोलन करू द्या. पण 29 तारखेला त्यांना मुंबईकडे जाऊ देऊ नका अशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे.

Laxman Hake : ..म्हणून शरद पवार भुजबळांची भेट, लक्ष्मण हाकेंचा मोठा खुलासा

follow us