राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून (Election) द्यायच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी 1 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे तर 18 जून रोजी मतदान पार पडणार आहे.
2018 मध्ये शिवसेना-भाजप युतीने मोठ्या मताधिक्याने ही जागा जिंकली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची 150 हून अधिक मते फोडत शिवसेनेच्या अंबादास दानवे यांनी सर्वाधिक मताधिक्याने विधान परिषदेवर निवडून जाण्याचा विक्रम तेव्हा केला होता. आता शिवसेना ही जागा राखणार? की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या दोन्ही जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष ठरलेला भाजप या मतदारसंघावर दावा सांगणार? याकडे लक्ष लागले आहे.
जालना, छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. तर संभाजीनगरची जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 9 पैकी 6 नगरपालिका या भाजपच्याच ताब्यात आहेत. जालना जिल्ह्यातील 3 पैकी 2 नगरपालिकांवरही भाजपचीच सत्ता आहे. या जोरावरच भाजप या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर दावा सांगू शकते. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे या जागेवर दावा सांगू शकतात. महायुतीकडे विजयासाठीचे पुरेसे संख्याबळ असल्याने आणि महाविकास आघाडीतील विरोधी पक्षामध्ये फारसा उत्साह नसल्याने ही निवडणूक महायुतीला अवघड जाणार नाही, अशी सद्यस्थिती आहे.
यामध्ये यासाठी महायुतीतील तीनही पक्षांमध्ये एकमत होणे महत्वाचे असणार आहे. गेल्या 3 वर्षात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणत इतर पक्षांमधून इनकमिंग झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून काही बडे चेहरे या दोन्ही पक्षात दाखल झाले आहेत. विधान परिषदेच्या या एका जागेवर इच्छुकांची संख्या अधिक असल्याने महायुतीच्या नेत्यांचे टेन्शन वाढणार आहे.
महायुतीमधील प्रमुख इच्छुक चेहरे
शिंदे शिवसेना: विप्लव बाजोरिया, अल्पसंख्याक नेते सईद खान, राम कदम, आनंद भरोसे.
अजित पवार राष्ट्रवादी: माजी आमदार विजय भांबळे, सुरेश नागरे.
भाजप: संतोष मुरकुटे, मिलिंद यंबल, माजी आमदार गजानन घुगे.
महाविकास आघाडीमधील प्रमुख इच्छुक चेहरे
काँग्रेस: सिद्धार्थ हत्तीअंबिरे, माजी आमदार सुरेश देशमुख.
उद्धव ठाकरे शिवसेना (उबाठा): डॉ. विवेक नावंदर.
