विधानपरिषद निवडणूक: अहिल्यानगरच्या जागेवर राष्ट्रवादी दावा ठोकणार की भाजप ? संख्याबळ कुणाच्या बाजूने ?
Vidhan Parishad Election-आता बदलत्या परिस्थितीत भाजप संख्याबळाने आघाडीवर असल्यामुळे महायुतीमध्ये ही जागा भाजप की अजित पवार गटाकडे जाणार याबद्दल उत्सुकता आहे.
Vidhan Parishad Election: अहिल्यानगर पुण्यासह १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने व तेथे प्रशासकराज असल्यामुळे विधान परिषदेची (Vidhan Parishad Election) ही जागा गेल्या ४ वर्षांपासून रिक्त राहिली होती. मात्र आता या निवडणुका जाहीर झाल्या असून कोण दावेदार असणार तसेच बसलेले राजकीय समीकरण पाहता पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. गेल्या निवडणुकीवेळी ही जागा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) होती. राष्ट्रवादीचे माजी आमदार तथा दिवंगत नेते अरुण जगताप हे आमदार राहिले होते मात्र त्यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. आता बदलत्या परिस्थितीत भाजप संख्याबळाने आघाडीवर असल्यामुळे महायुतीमध्ये ही जागा भाजप की अजित पवार गटाकडे जाणार याबद्दल उत्सुकता आहे.
विधानपरिषद निवडणुकीचा नगरचा इतिहास
श्रीरामपूरच्या ज. य. टेकावडे यांनी सहकारातील मातब्बर नेते शंकरराव कोल्हे यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभव केला होता. टेकावडे दोनदा विधान परिषदेवर निवडून गेले. त्यानंतर यशवंतराव गडाख हे देखील दोन वेळेस निवडून गेले. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरुण जगताप दोनदा निवडून गेले. त्यावेळी काँग्रेसची मते फुटली व तत्कालीन शिर्डी संस्थानचे अध्यक्ष जयंत ससाने यांना पराभव स्वीकारावा लागला. जगताप यांनी विधानसभेच्या तीन निवडणुका लढवल्या, मात्र अपयश आले. मात्र त्यांना विधिमंडळात विधान परिषदेतूनच प्रवेश करावा लागला.जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर पूर्वी काँग्रेसचे नंतर एकत्रित राष्ट्रवादीचे व आता नुकत्याच झालेल्या निवडणुकांतून भाजपचे वर्चस्व निर्माण झालेले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजप पक्षाला व त्यांच्या उमेदवारांसाठी अनुकूल वातावरण राहिलेले आहे, यातच जिल्ह्यात देखील नगर परिषद, नगर पंचायत सह महानगरपालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे.
पुणे स्थानिक स्वराज्यचा कुणाचा आमदार होणार ? राष्ट्रवादी अन भाजपमध्ये जोरदार टक्कर !
घुले इच्छुक तर तनपुरेंची नावाची चर्चा
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटकडून माजी आमदार राहिलेले चंद्रशेखर घुले हे गेल्या अनेक दिवसांपासून इच्छुक आहेत. परंतु निवडणूक जाहीर होत नसल्यामुळे त्यांची जिल्हा बँकेचे अध्यक्ष पदावर वर्णी लागली. दरम्यान नुकतेच झालेल्या राहुरी पोटनिवडणुकीत देखील अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कातून राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भाजपला अनुकूल भूमिका घेत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपचे अक्षय कर्डिले यांना विजय सहजसाध्य झाला. तनपुरे यांना विधान परिषदेसाठी शब्द मिळाल्याची जोरदार चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. मात्र त्यांना त्यासाठी भाजप किंवा राष्ट्रवादीकडे जावे लागणार आहे. ते कोणती भूमिका घेतात, याकडेही लक्ष राहील.
मोदींचं आवाहन एका बाजूला अन् कोल्हापुरी नाद दुसऱ्या बाजूला; जावयासाठी बनवले ‘चांदीचे जोडे’
आमदाराची संख्या १८ होणार
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवून विजयी झालेले १२ आमदार आहे. या निवडणुकीमुळे आता जिल्ह्यातील एकूण आमदारांची संख्या १८ होणार आहे. यापूर्वी राम शिंदे, सत्यजित तांबे व विवेक कोल्हे या तिघांची विधान परिषदेवर नियुक्ती झालेली आहे. तर शिवाजीराव गर्जे, सुनील कर्जतकर हेही विधानपरिषदेचे सदस्य आहेत. ते मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थेतून एक जण विधानपरिषदेवर जाईल. त्यामुळे जिल्ह्यात तब्बल 18 आमदार असणार आहेत.
तसेच यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांची ही जागा राष्ट्रवादीकडे होती. त्यावेळी राष्ट्रवादी एकत्रित होती. आता राष्ट्रवादीत फूट पडलेली आहे. शिवाय या मतदारसंघात आता भाजपचे संख्याबळ वाढलेले आहे. त्यामुळे पक्षाकडेच ही जागा असावी अशी आग्रही भूमिका जिल्हा भाजपकडून मांडली जाऊ लागली आहे.