Pankaja Munde on Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम जोरात वाजू लागले (Maharashtra Elections 2024) आहेत. लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेते मंडळींकडून सेफ पक्षांचा शोध घेतला जात आहे. तर फोडाफोडीच्या राजकारणालाही वेग आला आहे. जागावाटपाच्या चर्चानीही वेग घेतला आहे. या घडामोडी घडत असतानाच विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महायुतीत मलाच लढण्यासाठी जागा नाही म्हणून मी विधानपरिषदेवर आले असे वक्तव्य पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले.
भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी त्यांना माजी खासदार प्रितम मुंडे यांना तुमच्यासाठी जागा सोडावी लागली. आता त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने त्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार का? मिळालं तर कोणत्या मतदारसंघातून त्या निवडणूक लढतील? असा प्रश्न विचारण्यात आला.
पंकजा मुंडे म्हणाल्या, पक्षानं डिक्लेर केल्यामुळे मला निवडणूक लढावी लागली असं ते चित्र आहे. आमच्यात सध्या तशी काही चर्चा नाही. आता महायुतीत मलाच जागा नाही त्यामुळे मी विधानपरिषदेवर आहे. ज्यावेळी लढायची गरज असेल त्यावेळी नक्की लढू. ज्यावेळी संघटनेचं काम करण्याची गरज असेल त्यावेळी संघटनेचं काम करू. पाच वर्ष मी देखील संघटनेचं काम केलं आहे. आमच्या घरावर भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्षे अन् पिढ्यानपिढ्यांचे संस्कार आहेत. त्यामुळे जो काही निर्णय घ्यावा लागेल तो योग्य वेळी घेऊ.
पक्षाने मला जबाबदारी दिली होती. आता मलाच लढण्यासाठी जागा नाही त्यामुळे मी विधानपरिषदेवर आले. आता पक्ष सांगेल ते करू, योग्य वेळी निर्णय घेऊ, पक्षाकडे आम्ही काही मागत नाही असेही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले.
Pankaja Munde: Pankaja Munde : राज्यात माझ्या निवडणुकीची चर्चा जास्त पण, आशीर्वाद द्यायलाच कुणी नाही
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, प्रभारी, राज्याचे नेते मिळून प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. काल मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या आहेत. जास्तीत जास्त बूथ निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जागावाटपा संदर्भात अधिकृत निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती पक्षाचे वरिष्ठ नेते जाहीर करतील असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.