लातूर : भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वांना सर्वश्रुत आहे. काही दिवसांवर आलेल्या लातूर (Latur) महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप आणि काँग्रेसने कंबर कसलीय. यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख यांच्यावर जोरदार टीका केलीय. देशमुखांना त्यांच्या मतदार संघात मुताऱ्या देखील बांधता आल्या नाहीत, असा टोला देशमुखांना संभाजी पाटील निलंगेकर यांनी लागवला आहे.
संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, मागील पाच वर्षात सर्वात जास्त अन्याय निलंगा मतदारसंघावर झाला आहे. मागचा लातुरचा इतिहास काढून बघा आणि 2014 ते 2019 चा आमच्या सरकारच्या काळातील इतिहास काढून बघा. जेवढा पैसा आणि निधी मी लातुरला दिला तेवढा कधीच दिला गेला नाही. तिथल्या स्थानिक आमदारांना जाहीर आव्हान आहे. 2014 ते 2019 चा आणि मागच्या काळातील इतिहास त्यांनी काढून दाखवावा? कोणत्या सरकारच्या काळात जास्त निधी आला हे सांगाव, असे जाहीर आव्हान भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुखांना दिले आहे.
पेपरफुटीप्रकरणी आणखी दोघांना अटक; आरोपींची संख्या सातवर
निलंगेकर पुढं म्हणाले, त्यांच्या पूर्ण काँग्रेसमधील कारकिर्दीत जेवढं पैसे आले नाहीत तेवढे पैसे आम्ही दिलेत. लातूर शहरातील एसटीपी प्लॅनसाठी 350 कोटी रुपये दिले होते.साध्या मुताऱ्या देखील त्यांना बांधता आल्या नव्हत्या, आपण बांधून दिल्या आहेत. एवढी तरी त्यांनी जाणीव ठेवावी, अशी टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी देशमुख बंधु भाजपात येणार असा गौप्यस्फोट संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला होता. त्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील लातूरकर कधीही फडवणवीसांच्या मांडीवर जाऊन बसतील, असा दावा केला होता.