नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत MIM ला 33 जागा, जिल्हा परिषदेला झीरो जागा

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या ६३ आणि पंचायत समितीच्या १२६ जागांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले.

  • Written By: Published:
MIM

महानगरपालिका निवडणुकीत भरघोस यश मिळवणाऱ्या भाजपाने (ZP) जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला. छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा मोठं यश मिळालं. त्यापाठोपाठ शिंदे गट हा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. परंतु, महापालिकेत तब्बल ३३ जागा जिंकणाऱ्या एमआयएमला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही.

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या ६३ आणि पंचायत समितीच्या १२६ जागांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. आज (९ फेब्रुवारी) निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाचा प्रभाव वाढताना दिसून आला. जिल्ह्यातील बहुतांश जागांवर भाजपा-शिंदेसेना यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळाला. या निवडणुकीत जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या वारसांनी बाजी मारत आपले राजकीय वर्चस्व अबाधित राखले.

मोठी बातमी! चंद्रपूरमध्ये भाजपच्या संगीता खांडेकर महापौर

शिंदेसेनेचे खासदार संदीपान भूमरे आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह भाजपाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या कुटुंबातील युवा नेतृत्वाने आपापल्या बालेकिल्ल्यात विजयाची पताका फडकावली. सिल्लोडमध्ये पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांची जादू चालली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंभई गटातून त्यांचे सुपुत्र आमेर सत्तार विजयी झाले. संदीपान भूमरे यांचे पुतणे शिवराज भूमरे यांनी पाचोड गटात आपला दबदबा कायम ठेवला. भाजपाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांचे पुतणे निखिल चव्हाण यांनीही गणोरी गटातून विजय संपादन केला.

कोणत्या पक्षाला किती जागा?

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या ६३ पैकी ६३ जागांवरील कल हाती आले. त्यानुसार भारतीय जनता पक्ष हा पुन्हा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपाने जिल्हा परिषदांच्या ६३ पैकी सर्वाधिक २३ जागा जिंकल्या. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाने २० जागांवर विजय मिळवला, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नऊ जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. त्याशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागांवर यश मिळवले. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. महापालिका निवडणुकीत ३३ जागा जिंकणाऱ्या एमआयएमला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही.

Tags

follow us