पोलिसांनी मुख्य सुत्रधाराचं नाव टाळलं; बीडच्या खून प्रकरणात धनंजय मुंडे विधानसभेत आक्रमक

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी धनंजय मुंडे यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य कार्यवाहीचे निर्देश गृह विभागाला दिले आहेत.

News Photo   2026 06 23T141018.895

पोलिसांनी मुख्य सुत्रधाराचं नाव टाळलं; बीडच्या खून प्रकरणात धनंजय मुंडे विधानसभेत आक्रमक

बीड जिल्ह्यातील केजमधील हत्याप्रकरण (Beed) चांगलच तापलं आहे. विधानसभेचं अधिवेशन चालू असून त्यामध्ये परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी पोलिसांवर यातील मुख्य व्यक्तीचं नाव घेत नाहीत असा आरोप केला. तर, मंत्री पकंजा मुंडे यांनीही, विलास घुले या तरूणाच्या मृत्यूची घटना अतिशय दुर्दैवी आहे. पोलीस अधीक्षक नवनती कॉवत यांना पोलिसांनी कसल्याही दडपणाला बळी न पडता दोषींवर कडक कारवाई करावी, अशा सूचना दिल्या आहेत असं म्हटलं आहे.

केज तालुक्यात 20 जूनच्या रात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेत हत्येचा कट रचून हल्ला एकावर केला. मात्र, सोडवण्यासाठी आलेल्या विलास घुले याच्यावर वार करून हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित कट असून याचा खरा सूत्रधार कोण, याचा शोध घेऊन विलास घुले याला न्याय मिळावा यासाठी केजमध्ये हजारो लोक घुले कुटुंबियांच्या सोबत रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणात आरोपींची सर्व पाळे-मुळे खोदून काढत खरा सूत्रधार कोण आहे, याचा तपास करावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली आहे.

भांडण सोडवण जीवावर बेदल; बीड जिल्ह्यात हॉटेल मालकाचा चाकू भोकसून खून

विलास घुले या निष्पाप तरुणाला विनाकारण आपले प्राण गमवावे लागले, याचा तीव्र निषेध करत कुटुंबीय व हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून, हत्येच्या आज चौथ्या दिवशी सुद्धा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यास घुले कुटुंबियांनी नकार दिला आहे. दुसरीकडं हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असुन केजमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला असून, पोलीस ठाणे व अन्य ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू आहे.

दरम्यान, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, या प्रकरणी कट रचून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला तर दुसऱ्या व्यक्तीची हत्या असा दुहेरी गुन्हा घडलेला असून, पोलीस प्रशासनाने सर्व बाजूंनी वस्तुनिष्ठ तपास करून मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन सर्व आरोपींना अटक करावी, याबाबत केज पोलिसांना निर्देश दिले जावेत, अशी मागणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी धनंजय मुंडे यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य कार्यवाहीचे निर्देश गृह विभागाला दिले आहेत.

पंकजा मुंडे यांनी देखील या घटनेबाबत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी विस्तृत चर्चा करून माहिती घेतली आहे. या घटनेवर बोलताना त्या म्हणाल्या, माझ्या माहितीनुसार भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला मारणं, इतकं की त्याचा मृत्यू व्हावा हे अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेत विलास घुले या तरूणाला काहीही संबंध नसताना हकनाक मृत्यू स्वीकारावा लागला आहे.

हे सर्व अस्वस्थ करणारं आहे. यासंदर्भात मी एसपी कावत यांच्याशी सविस्तर बोलले आहे, त्यांनी योग्य तपास करावा. मृत तरुणाच्या परिवाराने ही विश्वास दाखवून सहयोग करावा. त्याच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करावे.तेच योग्य आहे. मी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करेन. योग्य न्यायासाठी आम्ही पाठिशी आहोत असंही मुंडे यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version