Download App

धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न; कासलेंचा धक्कादायक दावा

वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला होता, असा दावा कासले यांनी केला आहे. 

Beed Crime : राज्यात बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्यांची चर्चा आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांनी राजकारणही ढवळून निघालं. यातच आता निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याबाबतीत अतिशय धक्कादायक दावा केला आहे. रणजित कासलेंच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला होता, असा दावा कासले यांनी केला आहे. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) तुरुंगात आहे. कराडसह आणखी काही आरोपी तुरुंगात आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जात आहे.

धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न केला होता. कराड त्यांची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढणार होता. त्यामुळे ते खुनाचा आरोप सहआरोपी झाले असते असा अतिशय धक्कादायक दावा निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला आहे. नव्याने जो व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे त्यात कासले यांनी हा दावा केला आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही धनंजय मुंडेंना पाठिंबा देत असल्याचा आरोप केला आहे.

धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री फडणवीसांचा पाठिंबा आहे आणि संतोष देशमुख प्रकरणात पुरावे दाबण्यात आल्याने धनंजय मुंडे आता सहआरोपी होणार नाहीत असा दावा कासले यांनी केला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावं असं आव्हानही रणजित कासले यांनी दिलं आहे. त्यांच्या या दाव्यानंतर बीड जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

धनंजय मुंडे अन् गटच वाल्मिक कराडला संपवणार; तृप्ती देसाईंचा गंभीर दावा

मलाही कराडच्या एन्काऊंटरची ऑफर : कासले

फेक एन्काऊंटर कसे होतात हे मी सांगतो. ज्यावेळी मला वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर दिली होती पण मी नकार दिला. एन्काऊंटरसाठी मोठी रक्कम ऑफर दिली जाते, १०, २०, ५० कोटी इतके दिले जातात. तुम्ही बोलाल तेवढे पैसे देतात. मी सायबर शाखेत होतो, पण मी हे करू शकतो हे माहिती असल्याने त्यांनी मला ऑफर दिली होती असं त्यांनी सांगितलं आहे. मी मोठेपणा सांगत नाही. परंतु, फेक एन्काऊंटर करताना ४ लोकांची टीम असते, त्यात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गृह सचिवांची गुप्त बैठक होते. त्यात काय करायचं हे ठरतं. मग त्यानंतर ५-६ विश्वासू लोकांची टीम बनते असा धक्कादायक खुलासाही कासले यांनी आधीच्या व्हिडिओत केला होता.

follow us