Parali Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात जवळपास 64 टक्के मतदान झालं. या मतदाना दरम्यान अनेक ठिकाणी राडा झाला. बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात हाणामारी आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. परळी मतदारसंघात लोकशाही मार्गाने मतदान झाले नाही त्यामुळे येथील 122 मतदान केंद्रांवर फेर मतदान घेण्यात यावे अशी मागणी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे.
राज्यातील 288 मतदारसंघांत बुधवारी मतदान झालं. यात परळी मतदारसंघात चांगलाच राडा झाला. हाणामारी आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राजेसाहेब देशमुख आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप केले होते. यानंतर देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून परळीत धनंजय मुंडे यांचीच दहशत असल्याचा आरोप केला आहे. येथील 122 मतदान केंद्रांवर फेर मतदान घेण्यात यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
VIDEO : परळीत मोठा राडा! मुडेंच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाच्या नेत्याला केली मारहाण
परळीत बिहारपेक्षाही जास्त गुंडगिरी सुरू आहे. येथील मतदान केंद्रांवरील सीसीटीव्हीचे कनेक्शन काढण्यात आले. धनंजय मुंडेंच्या लोकांनी मतदान केंद्रांवर तोडफोड केली. माझ्या मुलासह पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. परळीत लोकशाही मार्गाने मतदान झालेलं नाही तेव्हा येथील 122 मतदान केंद्रांवर फेर मतदान घ्या अशी मागणी राजेसाहेब देशमुख यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, मुंडे यांनी आमच्यावर केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. येथे सर्व त्यांचेच साम्राज्य आहे. पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाची त्यांना साथ आहे. येथे याआधी कधीच इतकी अराजकता निर्माण झाली नव्हती. सत्तेचा गैरवापर करून सर्वसामान्यांना उद्धवस्त करण्याचं काम सध्या सुरू आहे. प्रचारात आमच्यासोबत एकही माणूस येणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. बिहारलाही लाजवेल अशी गुंडगिरी येथे सुरू असल्याचा आरोप राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे.
मीच तुतारीच्या नेत्याला सांगितलं अन् माझ्याविरुद्ध.. धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने खळबळ