Nanded Government Hospital Death : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nandedchya Government Hospital Death) 41 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जाते आहे. सरकारच्या दुर्लक्षपणामुळंच हा प्रकार घडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, सावंत यांनी या शासकीय रुग्णालयातील या मृत्यूंना संपूर्ण मंत्रिमंडळच (Cabinet) जबाबदार असल्याचं सांगत हात झटकले.
नाशिकमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांची (सीएचओ) दोन दिवसीय प्रादेशिक परिषद सुरू आहे. या परिषदेत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्त्वय केलं. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारही उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात बोलतांना तानाजी सावंत म्हणाले, प्रथम ठाण्यातील कळवा रुग्णालय, नंतर नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात जे मृत्यू झाले, त्याचा आरोग्य विभागाशी संबंध नाही. ही महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी आहे. नांदेडमधील शासकीय रुग्णालय हे आरोग्य विभागाच्या अखत्यारीत नसून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये होणाऱ्या मृत्यूंचा आरोग्य विभागाशी काहीही संबंध नसल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे.
सावंत म्हणाले, रज्यात औषधांचा तुटवडा, टंचाई, खरेदी रखडल्याची ओरड केली जात आहे. मात्र, राज्यात औषधांचा तुटवडा नाही. खरेदीही रखडलेली नाही. याऊलट राज्य शासनाने खरेदी प्रक्रिया राबवण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना केली आहे. यामाध्यमातून खरेदी प्रक्रिया राबवली जाणार आहे. औषधांची खरेदी वेळेवर व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून तसे आदेशही काढण्यात आले आहेत.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणावरून विरोधकांकडून टीका केली जाते. यावरही सावंत यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, नांदेड प्रकरणावर विरोधकांकडून राजकारण केले जात असून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातून डॉक्टरांचे खच्चीकरण होत आहे. आरोग्य हा अतिशय संवेदनशील विषय आहे. येथे राजकारण करणं अयोग्य आहे. लोकांच्या भावना भडवण्याचे काम विरोधकांनी करू नये, असं सावंत यांनी म्हटलं.
दरम्यान, शासकीय रुग्णालयांमध्ये होणाऱ्या मृत्यूंचा आरोग्य विभागाशी काहीही संबंध नाही, असं विधान सावंत यांनी केल्यानं त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले, तानाजी सावंत आपला जिल्हा सांभाळू शकत नाहीत. ते राज्य काय हाताळणार? सावंत म्हणाले ते खरंच आहे. एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, संपूर्ण राज्य सरकार सरकारी रुग्णालयातील मृत्यूला जबाबदार आहे.