बीड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Beed) मागील मंगळवारी दिवसांपूर्वी अंकुश नगर परिसरात एका तरुणाची भररस्त्यात गोळ्या झाडून आणि त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, प्राथमिक तपासात ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हर्षद उर्फ दादा शिंदे हे मंगळवारी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास अंकुश नगर भागात सुरू असलेल्या एका नाल्याच्या कामाच्या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी आरोपी विशाल सूर्यवंशी तिथे आला आणि त्याने हर्षद यांच्यावर बंदुकीतून दोन राऊंड फायर केले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हर्षद यांनी तिथून पळ काढला, मात्र आरोपीने त्यांचा पाठलाग केला. अखेर आरोपीने त्यांना गाठून धारदार शस्त्राने त्यांच्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, हर्षद शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.
धक्कादायक बातमी! बीड शहरात गोळीबार, खोदकाम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू
आता ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासात व्यक्त केला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी पूजा पवार आणि पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. मुख्य आरोपी विशाल सूर्यवंशी सध्या फरार असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथकं रवाना केली आहेत. प्राथमिक चौकशीत या हत्येमागे अनैतिक संबंधांचं कारण असावं, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
आरोपीला अटक केल्यानंतरच हत्येचं नेमकं आणि सविस्तर कारण स्पष्ट होईल. भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या झालेल्या या हत्याकांडामुळे अंकुश नगर परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणातील सर्व दुवे जोडत असून, या घटनेत आणखी कोणाचा हात आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
