पुण्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ; विजय कुंभार यांनी फोडला 300 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा बॉम्ब
विजय कुंभार यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तब्बल 300 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा गंभीर आरोप करत नवा बॉम्ब फोडला.
Vijay Kumbhar explodes the bombshell of a Rs 300 crore scam : नुकत्याच गाजलेल्या मुंढवा जमीन व्यवहारानंतर पुण्याच्या(Pune) राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तब्बल 300 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा गंभीर आरोप करत नवा बॉम्ब फोडला आहे. विजय कुंभार(Vijay Kumbhar) यांनी सांगितले की, मुंढवा जमीन व्यवहारात ज्या करारावर स्वाक्षरी झाली होती, त्यामध्ये साक्षीदार असलेलीच एक व्यक्ती आणि तिच्यासोबत इतर काही सदस्यांच्या संगनमताने हा मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करण्यात आला आहे. संबंधित भूखंडावर उभारण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये एका संस्थेचे कार्यालय स्थापन करण्यात आले असून, प्रकल्पातील इतर मालमत्तांची विक्री करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
कुंभार यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील सुमारे दोन एकराचा भूखंड धर्मादाय आयुक्तालयाकडून एका कंपनीला 60 वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यात आला होता. मात्र, या जागेवर केवळ 15 हजार चौरस फूट चटई क्षेत्र मंजूर असताना, प्रत्यक्षात तब्बल 63 हजार चौरस फुटांचे बांधकाम करण्यात आले आहे. या प्रकल्पाची नोंद महारेराकडे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महत्त्वाची बाब म्हणजे, धर्मादाय ट्रस्टची जागा केवळ भाडेतत्त्वावर दिलेली असताना, त्या जागेचे एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेकडे आणि नंतर पुन्हा एका खासगी कंपनीकडे हस्तांतर झाल्याचे दाखवण्यात आले आहे. जागा विक्री करण्याचा कोणताही अधिकार नसतानाही संबंधित कंपनीने या जागेवरील सहा मजले परस्पर विकल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे. या सर्व मालमत्तेची आजच्या बाजारभावानुसार किंमत 300 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणात संस्थेची जागा विकसित करण्यासाठी एका व्यक्तीला ‘कुलमुखत्यार’ नियुक्त करण्यात आले होते. हीच व्यक्ती मुंढवा जमीन व्यवहारातील करारामध्ये साक्षीदार असल्याचे समोर आले आहे. तसेच, या जागेसाठी राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया देखील योगायोग नसून, ठरवून हा भूखंड लाटण्याचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप कुंभार यांनी केला. याशिवाय, भाडेपट्ट्याने दिलेल्या जागेवर बँकेचे कर्ज घेता येत नसतानाही, संबंधित जागेवर तब्बल 25 कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आल्याचे कुंभार यांनी सांगितले. सन 2017 पासून या जागेवर बांधकाम सुरू करण्यात आले असून, नुकतेच इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी यावेळी केली आहे.
