छत्रपती संभाजीनगर शहरात धक्कादायक घटनो समोर आली आहे. (Chhatrapati Sambhajinagar) मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या २३ वर्षीय तरुणीवर एका ५८ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने अत्याचार केल्याचा आरोप झाला आहे. मदतीचा बहाणा करून तरुणीचा विश्वास संपादन करत पीएसआयने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची माहिती आहे.
राहुरी हादरली!15 वर्षीय मुलीचे अपहरण, पाच दिवस जंगलात अत्याचार
या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात संबंधित अधिकारी, त्याची पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ मार्च २०२५ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शहरात घडली. लग्नाचे खोटे आमिष दाखवून त्यांनी शहरात विविध ठिकाणी तरुणीवर अत्याचार केले, इतकंच नाही तर बनावट मंगळसूत्र बांधून ती आपली पत्नी असल्याचंही भासवलं. या काळात पीडितेची इच्छा नसताना तिचे तीनवेळा गर्भपात घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात २३ वर्षीय तरुणीने तक्रार दिली. ती मूळची नांदेडची असून पुण्यात खासगी नोकरी करते. ७ मार्च २०२५ रोजी मोबाइल हरवल्याची तक्रार देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गेली होती. त्यावेळी तिची ओळख पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण याच्याशी झाली. त्याच दिवशी त्याने पीडितेला फोन केला व तुमचा नंबर कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला फोन केल्याची थाप मारली. त्यानंतर तो सतत पीडितेला फोनवर बोलत होता, त्यामुळे त्यांच्या बोलण्याचे रुपांतर प्रेमात झालं.
पुढं विविध ठिकाणी लॉजवर नेऊन संबंध ठेवले. या काळात ती गर्भवती राहिल्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध पुणे व संभाजीनगर येथे तीन वेळा गर्भपात केल्याचे तक्रारीत नमूद आहे. जेव्हा तरुणीने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा आरोपीने तिला जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणाची माहिती मिळताच आरोपीची पत्नी नर्मदा चव्हाण आणि मुलगा सागर चव्हाण यांनीही पीडितेला मारहाण करून धमकावल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंद आहे. २८ जानेवारी रोजी पुन्हा आरोपीच्या पत्नीने, नवऱ्याचा पाठलाग करू नको, गर्भपात कर, असे म्हणत मारहाण केली. आरोपीच्या मुलानेही मारहाण केल्याने पीडितेचा दीड महिन्याचा गर्भपात झाल्याचे नमूद आहे. शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तरुणीने पोलिसांत धाव घेतली. सध्या पोलीस या गंभीर प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
