झोपलेल्या वडिलांची डोक्यात दांडा घालून मुलाने केली हत्या, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
फिर्यादी शाहिन शेख मती शेख (२३) याच्या तक्रारीनुसार, मयत मती शेख आणि त्यांची दोन मुलं शाहिन व अजीऊल हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत.
क्षुल्लक कारणावरून पोटच्या १९ वर्षीय मुलानेच (Murder) जन्मदात्या पित्याच्या डोक्यात लाकडी दांडका घालून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.९) सकाळी ७ ते ७.३० वाजेच्या सुमारास कटकटगेट परिसरातील बाबर कॉलनी येथे घडली. मती शेख (रा. मूळ पश्चिम बंगाल) असं खून झालेल्या पित्याचं नाव आहे. याप्रकरणी संशयित मुलगा अजीऊल शेख (१९) याच्यावर जिन्सी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरार झाला आहे.
फिर्यादी शाहिन शेख मती शेख (२३) याच्या तक्रारीनुसार, मयत मती शेख आणि त्यांची दोन मुलं शाहिन व अजीऊल हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. ते सध्या बाबर कॉलनी येथे भाड्याच्या खोलीत राहून कटकटगेट येथील एका बेकरीत काम करत होते. सोमवारी (दि. ८) रात्री हे तिघेही वडील आणि मुले जेवण करून झोपले होते. मंगळवारी सकाळी ७वाजेच्या सुमारास मोठा भाऊ शाहिन हा बाथरूममध्ये गेला होता. त्यावेळी मती शेख झोपलेले होते व संशयित आरोपी अजीऊल उठून बेडवर बसलेला होता.
शाहिन पावणेआठच्या सुमारास बाथरूममधून बाहेर आला असता, त्याला त्याचे वडील रक्ताच्या थारोळ्यात बिछान्यावर पडलेले दिसले. त्यांच्याजवळच एक लाकडी दांडा पडलेला होता व भाऊ अजीऊल तेथून पसार झाला होता. शाहीने तात्कळ घरमालकाच्या मदतीने वडिलांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
तात्कालिक कारणावरून अजीऊलने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले असून, पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते, पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. फरार आरोपी अजीऊलच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. त्याने वडिलांना का मारले हे समोर येईल, असे पोलिस निरीक्षक बुधवंत यांनी सांगितले.