वेरूळ येथील शिक्षकाच्या संशयास्पद मृत्यू (Murder) प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांचाच सहभाग निष्पन्न होत असल्याने जिल्हा पोलिसांची भूमिका आणि तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने गुन्ह्याचा तपास अखेर सीआयडी (गुन्हे अन्वेषण विभाग) कडे वर्ग करण्यात आला. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून शुक्रवारी याबाबतचे आदेश जारी झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
११ जूनला गुन्ह्यातील आरोपींचा शोधासाठी गेलेल्या वैजापूर पोलिस आणि त्यांच्यासोबतच्या संशयितांनी केलेल्या मारहाणीत निष्पाप शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे (रा. वेरूळ) यांचा मृत्यू झाला. बाेरसे मृत्यू प्रकरणात राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. १० जूनच्या रात्री वैजापूरचा पोलिस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, अंमलदार वाल्मीक बनगे एका विनाक्रमांकाच्या खाजगी वाहनाने वेरूळ गावात दाखल झाले. धक्कादायक बाब म्हणजे, नियमानुसार स्थानिक खुलताबाद पोलिसांनादेखील वेरूळ गावात तपासासाठी आल्याची पूर्वकल्पना देणे बंधनकारक होते. मात्र, नागरगोजे, बनगेने तशी नोंद केली नाही. मारहाणीत शिक्षक बोरसे बेशुद्ध पडून त्यांचा मृत्यू झाला.
ही बाब अंगलट येत असल्याचे लक्षात येताच, नागरगोजेने खुलताबाद ठाणे गाठून ‘बॅक डेट’ (जुनी) नोंद करण्यासाठी खुलताबाद ठाण्यात रात्रपाळीवरील अधिकारी, अंमलदारावर दबाव टाकला होता. या संपूर्ण प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाची गती संशयास्पद राहिली. सर्व स्तरातून टीका होत असताना संशयित पोलिस अधिकारी आणि अंमलदार वैजापूर ठाण्यात ठाण मांडून होते. दोन दिवसांपूर्वी नागरगोजे व बानगेचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न करुन पोलिसांनी त्यांना अटक करुन निलंबित करण्यात आले. पोलिसांचा थेट सहभाग व तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने तपास सीआयडीकडं वर्ग करण्याची मागणी जोर धरत होती.
याबाबतचे आदेश जारी होताच शुक्रवारी सीआयडीच्या पथकाने तपासाचे सर्व दस्तावेज हस्तगत केले. शिवाय, पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. तपास हाती घेताच ‘सीआयडी’चे पोलिस अधीक्षक यशवंत काळे, डीवायएसपी रवींद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक सुमंतराज भुजबळ, महिला पोलिस निरीक्षक अनुराधा भालेराव, खुलताबादचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी शुक्रवारी सायंकाळी थेट वेरूळ येथील बोरसे यांच्या निवासस्थानी भेट दिली.
महाजन यांनी मृत शिक्षक सुरेश यांच्या पत्नी अनिता बोरसे, आई मालतीबाई, बहीण छाया माळी, भाऊ रमेश बोरसे आणि मुलींशी या घटनेबाबत चर्चा करून माहिती घेतली. यावेळी त्यांच्य्या आईने ‘माझ्या मुलाला मारहाण करून मारले , आम्हाला न्याय द्या,’ असे हात जोडून सीआयडी अधिकाऱ्यांना विनंती केली. त्यानंतर सीआयडी पथकाने खुलताबाद ठाण्यातील अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. पावसाळी अधिवेशन तोंडावर असल्याने राज्य सरकारने तातडीने ही पावले उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
