जालन्यात पाणी वाया घातलं तर इतक्या हजारांचा होणार दंड; आयुक्तांनी काढले कडक आदेश

Jalna Drought : दुष्काळी परिस्थितीत जालना जिल्ह्यात पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कडक निर्णय घेतले असुन पिकांच्या पंचनाम्यांनाही वेग आला आहे.

News Photo   2026 10 07T154026.529

Jalna Drought

Jalna Drought :  दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असताना (Jalna) जालना शहर महानगरपालिकेने पाण्याच्या काटकसरीच्या वापरासाठी कडक पावलं उचलली आहेत. शहरातील नागरिकांकडुन पाण्याचा अपव्यय आढळल्यास 5 हजार रुपयांपासुन 25 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी आदेश काढले असुन घरगुती नळ जोडणीच्या तोट्या तसेच अंतर्गत जलवाहिनीत गळती असल्यास 15 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती करुन घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

पाणी भरल्यानंतर नळ तात्काळ बंद करावेत, तसेच पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, असंही महापालिकेच्या आदेशात नमुद करण्यात आलं आहे. महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरुन पाणी खेचण्यासाठी विद्युत मोटार लावणे, रस्त्यावर वाहन धुणे किंवा घरासमोरील रस्ता पाण्यानं धुणे अशा प्रकारचा अपव्यय आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्याचा इशाराही प्रशासनाकडुन देण्यात आला आहे.

दुष्काळात शेतकऱ्यांना मुला-मुलींच्या लग्नाबाबत दिलासा! सरकार लागू करणार असलेला जी. श्रीकांत पॅटर्न काय?

दरम्यान, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आन्वा महसूल मंडळात दुष्काळी पिकांच्या पंचनाम्यांना वेग आला आहे. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पथकांकडुन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली जात आहे. रेणुकाई पिंपळगाव, पारध यासह परिसरातील काही गावांमध्ये पंचनामे पुर्ण झाले असुन महसूल विभागाकडुन इतर गावांमध्येही ही प्रक्रिया वेगानं राबवली जात आहे. दीड ते दोन महिन्यांपासुन पाऊस नसल्याने सोयाबीन, कपाशी आणि इतर खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

बदनापूर तालुक्यातही दुष्काळी पिकांच्या पंचनाम्याला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर केल्यानंतर महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांचं संयुक्त पथक शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहे. गेवराई बाजारसह परिसरातील विविध गावांमध्ये पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. पिकांची सद्यस्थिती, नुकसानीचं प्रमाण आणि पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती याची माहिती घेत पंचनामे करण्यात येत आहेत.

दुष्काळाचा परिणाम आता शेतीसोबतच पशुपालनावरही जाणवु लागला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात ओला चारा संपल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील दोन महिन्यांपासुन पाऊस नसल्याने अनेक शेतकऱ्यांकडे केवळ 10 ते 12 दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरकारनं तातडीनं जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडुन केली जात आहे.

यवतमाळ जिल्ह्यातही पावसाअभावी खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात सध्या सोयाबीन पिकाच्या कापणी प्रयोगांना सुरुवात झाली असुन यवतमाळ तालुक्यातील बोरगाव येथे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या उपस्थितीत शेतकरी नरेश बाजीराव गावंडे यांच्या शेतातील सोयाबीनची कापणी आणि मळणी करण्यात आली. दुष्काळजन्य परिस्थितीचा थेट परिणाम उत्पादनावर झाला असुन या प्रयोगात केवळ 1.09 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन नोंदवण्यात आलं आहे.

Exit mobile version